आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलो अन् २०१९ ला कन्नडचा आमदार झालो. गेल्या दाेन-अडीच वर्षांत स्वत: उद्धवजींनी मला नऊ वेळा फोन करून विचारपूस केली. कोरोनाच्या काळात सर्वाधिक फोन आले. कन्नड मतदारसंघातील लोकांची या काळात काळजी घेण्याची सूचना ते वारंवार करत. आमदार शिरसाट यांच्या आरोपावर मला फार बोलायचे नाही, पण या आराेपात तथ्य नाही एवढेच सांगेन. ‘वर्षा’वरही आतापर्यंत १५ वेळा मी त्यांना भेटलोय. तिथे मला कधीच ताटकळत बसावे लागले नाही. ठाकरेंचे पीए सुधीर नाईक, मिलिंद नार्वेकर यांचा फाेन केला मी मला तरी लगेच वेळ मिळत होती.
निधीच्या बाबतीत म्हणाल तर मला अडीच वर्षात ५५० कोटींचा निधी मिळाला. त्यात रस्त्यांसाठी १६५ कोटी, जलसंधारणासाठी १३० व पर्यटनसाठी १३ कोटी दिले. कन्नडमध्ये आतापर्यंत आलेला हा सर्वाधिक निधी आहे.
दानवे यांनी फोन बंद करायचे सांगितले होते काही आमदारांनी बंड केले तेव्हा माझाही फाेन बंद होता, पण ताे एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून नाही, तर अंबादास दानवे यांच्या सूचनेवरून. मी मालेगावला जात होतो. दानवे यांनी मला फोन करून मोबाइल बंद करण्यास सांगितले होते. ड्रायव्हरच्या फोनद्वारे आम्ही संपर्कात होतो. त्यांनी मला तातडीने मुंबई गाठण्यास सांगितले होते. मग मी वर्षा बंगल्यावर बैठकीसाठी गेलो होतो. तिथे उद्धवजी खूप व्यथित झाल्याचे आम्हाला दिसले. उद्धवजींनी मला उमेदवारी दिली, विजयी केले. मी त्यांना कदापि सोडणार नाही.
उद्धवजी मला म्हणाले, ‘तुम्हालाही जायचे तर जा’
एकनाथ शिंदे यांच्याशीदेखील माझे चांगले संबंध आहेत. पण त्यांनी केलेल्या बंडाचे मात्र मी समर्थन करत नाही. एकनाथ शिंदे व काही आमदार दूर निघून गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना खूप दु:ख झाले. गेल्या दाेन- तीन दिवसांत त्यांनी ‘वर्षा’वर बैठका घेऊन आम्हा सर्व आमदारांशी अनेकदा चर्चा केली. ठाकरे यांच्यासोबत जेव्हा बैठक झाली त्या वेळी त्यांनी आम्हा सर्व आमदारांना म्हटले की, ‘सर्वच जात आहेत, तर तुम्हीही जा. तुम्हाला मी काही बळजबरी करून थांबवू शकत नाही. तुम्ही तुमचा निर्णय घेण्यास सक्षम आहात.’ पण मी तत्त्व आणि निष्ठेला महत्त्व देणारा आहे. शिंदे मला मंत्रीही करू शकतील, पण मला पदाचा हव्यास नाही. मी शिवसेनेतच राहणार. उद्धव ठाकरेंना पदाचा मोह असल्याचे दिसले नाही त्यांनी आम्हाला सहकार्यच केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.