आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:मराठीशी नाळ, अमेरिकेच्या अभिनेत्याने जपला मराठीचा गोडवा

औरंगाबाद / नितीन पोटलाशेरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकरांचा नातू कपिलचा ‘दिव्य मराठी’शी संवाद

नाट्य आणि मराठी चित्रपटसृष्टीत रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे दिवंगत अभिनेते शरद तळवलकर यांचा नातू कपिल तळवलकर सध्या अमेरिकेत एनबीसीवरील ‘झोइज एक्स्ट्राऑर्डिनरी प्ले लिस्ट’ या म्युझिकल कॉमेडी टीव्ही सिरीजमध्ये भूमिका करत आहे. बालपणापासून अमेरिकेत राहिल्यानंतरही त्याच्या घरात मराठी संस्कृती आणि भाषा प्राणपणाने जपली आहे. २७ फेब्रुवारीचा हा दिवस त्याने व त्याच्या कुटुंबाने अमेरिकेत साजरा केला. मराठी भाषेविषयी कपिलने ‘दिव्य मराठी’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

प्र. एक मराठी माणूस म्हणून या भाषेविषयी तुझी काय भावना आहे?
उ. तसं पाहायला गेलं तर मराठी बोलण्यासाठी खूप अवघड वाटते. पण जाणीवपूर्वक माझ्या आई-बाबांनी घरात मराठी संस्कृती जपली. शालेय शिक्षण होईपर्यंत आम्ही घरात मराठीच बोलायचो. आजही बोलतो. पण शिक्षणासाठी बाहेर आल्यानंतर मात्र जास्त बोलता येत नाही. पण मराठी असल्याचा मला नेहमी अभिमान वाटताे. या भाषेतल्या गोडव्याची सर कशालाच येत नाही.

प्र. आजोबांचे मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे, त्यांचा वारसा तू पुढे कसा चालवत आहेस?
उ. आजोबांनी खडतर काळामध्ये रंगभूमी व चित्रपटातील अभिनयाची आवड जपली. त्या काळात प्रचंड आव्हाने असताना ते आपल्या कलेवर ठाम राहिले, म्हणून त्यांना यश मिळत गेले. त्यांची हीच शिकवण पुढे घेऊन मी अभिनयाच्या क्षेत्रात वाटचाल करत आहे. सुट्यांमध्ये घरी गेलो तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून आजोबांचे ‘गुदगुल्या’ हे पुस्तक वाचले. त्यात त्यांनी केलेला संघर्ष कळला. तेव्हाचा आणि माझा आताचा संघर्ष यात खूप साधर्म्य आहे. कुटुंबाने एकत्रित बसून ते पुस्तक वाचले तेव्हा या क्षेत्रातील संघर्षाची जाण आई-बाबांना झाली.

प्र. अभिनयाच्या क्षेत्रात प्रचंड आव्हाने आहेत. अमेरिकेत स्वत:ला सिद्ध करताना तू या आव्हानांना सामोरे कसा गेलास?
उ. अगदी बरोबर आहे. या क्षेत्रात अनेकदा तुम्हाला आवडीचे काम मिळत नाही. अनेक वर्षे संघर्ष करावा लागतो. मीही याला सामोरे गेलो. उबर टॅक्सी चालवण्यासह घरोघरी जाऊन ट्यूशन घेण्याचे काम केले. काही वेळा नैराश्यही आले. पण अभिनय माझ्या रक्तात असल्याने यात यश मिळवल्याशिवाय राहणार नाही, ही जिद्द मनात होती. त्यामुळे २१३ ऑडिशन्समध्ये सलग चार वर्षे नाकारले गेले, तरी प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर ‘झोइज एक्स्ट्राऑर्डिनरी प्ले लिस्ट’च्या निमित्ताने मोठी संधी मला मिळाली.

‘आयुष्यावर बोलू…’ गात दिल्या शुभेच्छा
मराठी गौरव भाषा दिनानिमित्त कपिलने पुण्यातील शरद तळवलकरांचे निकटवर्तीय श्रीप्रकाश सप्रेंच्या आठवणींना उजाळा दिला. भारतात आजोबा सुधाकर आजी सुनीता घोलप यांना भेटायला गेल्यानंतर ते नेहमी सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचे ‘आयुष्यावर बोलू काही’ हे गीत गाण्यासाठी सांगायचे. मुलाखतीदरम्यान कपिलने हेच गीत गात सर्वांना शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...