आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रयत्नांची शर्थ...:एकाचवेळी स्ट्रेचरवर पडले होते 16 मृतदेह; जखमींना वाचवण्यासाठी धावपळ अन् घाटीतला ‘ब्लॅक फ्रायडे’

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
करमाड येथील अपघातात बचावलेल्या मजुरांना पोलिस अधिकारी, डॉक्टर व घाटीतील कर्मचाऱ्यांनी आधार देत त्यांची विचारपूस केली. - Divya Marathi
करमाड येथील अपघातात बचावलेल्या मजुरांना पोलिस अधिकारी, डॉक्टर व घाटीतील कर्मचाऱ्यांनी आधार देत त्यांची विचारपूस केली.
  • करमाडवरून कॉल आला अन् उदास घाटी सुन्न झाली; जखमी मजुरांवर उपचारासाठी डॉक्टर, कर्मचाऱ्यांची प्रयत्नांची शर्थ...

शुक्रवारी सकाळी घाटीमध्ये गंभीर वातावरण होते. करमाडला अपघात झाल्याचे कळताच घाटी प्रशासन सतर्क झाले होतेे. काहीशी गर्दी कमी झालेल्या घाटी रुग्णालयात अचानक डॉक्टर व कर्मचारी स्ट्रेचर घेऊन दारात उभे होतेे. काही वेळातच तीन ते चार वाहनांतून सोळा जणांना घाटी परिसरात दाखल करण्यात आले. जखमी किती असतील याची सुरुवातीला मोजदाद नव्हती. वाहनांतून निपचित पडलेले देह बाहेर काढले जात होते आणि प्रत्येक व्यक्तीवर उपचार करून त्याचा जीव वाचलाच पाहिजे या जिद्दीने घाटीतील डॉक्टर व कर्मचारी प्राणपणाला लावून शर्तीचे प्रयत्न करत होते.

गाडीतून प्रत्येकाला बाहेर काढले जात होते आणि मृत घोषित केले जात होते. त्यात एक व्यक्ती गंभीर जखमी असल्याचे कळताच प्रत्येकाची लगबग सुरू झाली. त्या जखमीवर उपचार सुरू झाले. इतर सोळा मृतदेहांची रवानगी थेट शवविच्छेदन विभागात करण्यात आली. जिल्हाधिकारी उदय चौधरी, मोक्षदा पाटील यांनी करमाड येथील घटनास्थळाची पहाणी करून थेट घाटी धाव घेतली होती. घटनेत बचावलेल्या विरेंद्रसिंग व शिवभानसिंग या दोन मजुरांची विचारपूस करून या अधिकाऱ्यांनी त्यांना धीर दिला. घाबरलेल्या या दोघांना पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी चहा-बिस्कीटे देत आधार दिला. पोलीस उपाधीक्षक गणेश गावडे यांच्या सह करमाड पोलीस ठाण्याचे अधिकारी, अधीक्षक कार्यालयातील पथक माहिती गोळा करण्यासाठी धावपळ करत होते. एकीकडे केंद्रातून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वांनीच घटनेची दखल घेतल्याने कामाला वेग आला होता.

पंचवीस ते तीस अधिकारी, कर्मचारी, रेल्वे पोलीस, रेल्वेचे मेडिकल अधिकारी जखमींची चौकशी करत होते. कोणी डॉक्टरांशी संवाद साधत होते. साधारण बारा वाजता सर्वांची नावे निश्चित झाली. त्यानंतर पुढील कागदोपत्रांची कामे, मृतदेहाच्या पंचनाम्याचे काम सुरू झाले. हॉलच्या एका बाजूला काहींचे छिन्नविछीन्न मृतदेह स्ट्रेचरवर ठेवलेले होते. ताच्या काही अंतरावर एकीकडे रेल्वे पोलीस तर दुसरीकडे ग्रामीण पोलीस पंचनामे करत होते. एका कोपऱ्यात प्रत्यक्षदर्शींचा जवाब नोंदवला जात होता. दिवसभराची ही धावपळ झाल्यानंतर घाटीतून परतणाऱ्या प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी तरळले होते. प्रत्येकाच्याच ओठी शब्द होते. आजचा दिवस खूप वाईट होता.

बातम्या आणखी आहेत...