आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकसब्यातील महाविकास आघाडीचे यश आणि चिंचवडमधील भाजपच्या अल्प मताधिक्यामुळे राज्यातील राजकीय वास्तव हळूहळू बदलत असल्याचे दिसते. अर्थात यावरून संपूर्ण राजकारणाचा भविष्यकालीन ताळेबंद मांडणे चुकीचे ठरेल. असे मत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केले.
एरवी अत्यंत चलाखपणे खेळ्या करणारा भाजप कसब्यामध्ये मात्र सुरुवातीपासून फसत गेला. ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांसह देशातील काही जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचा गुरुवारी निकाल लागला. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपला यश मिळाले असले, तरी मेघालयात “एनपीपी’ने आघाडी घेतली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे.
तपास यंत्रणा आणि धनशक्तीच्या बळावर काहीही करू शकतो, असा गर्व झालेल्या पक्षाला मतदारांनी जागा दाखवून दिली आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. कसबा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकास एक पद्धतीने या सामन्याचा बरोबरीत निकाल लागला आहे, असे तांत्रिकदृष्ट्या म्हणता येईल. पण, वास्तवात ते तसे नाही.
कसब्यामध्ये काँग्रेसचे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. जनतेचे प्रश्न सोडवले, सतत संपर्कात राहिले, तर बलाढ्य सत्ताधाऱ्यांना यशस्वीपणे तोंड देता येईल, हे धंगेकरांनी दाखवून दिले. शिवाय, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने मिळून एकोप्याने ही निवडणूक लढवली. एरवी अत्यंत चलाखपणे खेळ्या करणारा भाजप कसब्यामध्ये मात्र सुरुवातीपासून फसत गेला.
दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तिकीट न दिल्यामुळे ब्राह्मण समाजात नाराजी निर्माण झाली. विरोधकांनी या गोष्टीचा भरपूर फायदा उठवत शनिवार, सदाशिव, नारायण या पेठा आणि पर्वती वगैरे परिसरात ब्राह्मण समाजात तीव्र असंतोष निर्माण होईल, असा पद्धतशीर प्रचार केला. खासदार गिरीश बापट यांची प्रकृती बरी नसून, ते लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही उपस्थित राहिले नव्हते. परंतु, तरीही त्यांना ऑक्सिजनच्या नळ्या लावलेल्या अवस्थेत घराबाहेर प्रचारात उतरवण्यात आले. यावरूनही भरपूर टीका झाली.
शिवाय, यापूर्वीच्या बापटांच्या विजयात पक्षापेक्षा त्यांच्या व्यक्तिगत सर्वपक्षीय संपर्काचा आणि सलोख्याचा हिस्सा होता. भाजपचे अनेक मंत्री पुण्यात तळ ठोकून होते. मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ही घडवण्यात आल्याचे आरोप झाले. त्यामुळे ही निवडणूक भाजपच्या हातातून गेली आहे, असे चित्र निर्माण झाले आणि अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही पाय रोवून दोन-तीन दिवस प्रचार केल्यामुळे भाजपची घाबरगुंडी उडाल्याचे दिसून आले.
चिंचवडमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनीताईंचा विजय झाला. पण, तो सहानुभूतीच्या लाटेमुळे झाला असून, भाजपचे मताधिक्य तेथे लक्षणीयरीत्या घटले आहे. राहुल कलाटेंनी बंडखोरी केली नसती, तर भाजपला मतविभागणीचा फायदा मिळाला नसता. कलाटेंना महाशक्तीचे पाठबळ तर होतेच; पण आपण भाजपच्या विरोधात आहोत, असा आभास उत्पन्न करणारे प्रकाश आंबेडकर प्रत्यक्षात कोणते खेळ करण्यात माहीर आहेत, हे पुन्हा एकदा दिसून आले.
कसब्यात महाविकास आघाडीला मिळालेले यश आणि चिंचवडमध्ये भाजपचे अल्प मताधिक्य यामुळे राज्यातील राजकीय वास्तव हळूहळू बदलत आहे, असे दिसते. अर्थात या दोन पोटनिवडणुकांवरून संपूर्ण राजकारणाचा भविष्यकालीन ताळेबंद मांडणे चुकीचे ठरेल. परंतु, आमच्यासमोर तयारीचा पैलवान आहेच कोण, असा पवित्रा असलेल्या फडणवीस यांना हा धक्का आहेच, शिवाय तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.
काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात पोटनिवडणुकांतील निकाल योगी आदित्यनाथांच्या विरोधात गेले. त्यामुळे विरोधी पक्ष इतके खूश झाले की, पुढच्या निवडणुकांपर्यंत निवांत राहिले आणि मग त्यांचा पराभव झाला. कसब्यातील विजयानंतर महाविकास आघाडी आत्मनंदात मग्न राहिली, तर आगामी निवडणुकीत त्यांनाही असाच फटका बसू शकेल. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.