आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराच्या नामांतरावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय पुढाऱ्यांकडून परस्परविरोधी वक्तव्ये सुरू आहेत. ती सर्वसामान्य जनतेत अस्वस्थता निर्माण करत आहेत. आता कोणत्याही प्रकारची अशांतता कुणालाच परवडणारी नाही. या अशांततेचा परिणाम व्यापार, उद्योग, पर्यटन व क्रमाने सामान्यांवर होईल. त्यामुळे आपण शहरातील अनिश्चिततेला विराम देण्यासाठी सर्व विचारधारांच्या प्रमुखांना एकत्र बोलावून सामंजस्याने विषय मार्गी लावून शांतता अबाधित राखावी, असे साकडे शहरातील उद्योजक, व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्राद्वारे घातले आहे.
२४ फेब्रुवारीला केंद्र सरकारने आैरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यास मंजुरी दिली. त्यानंतर सर्वच पातळ्यांवर नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु खासदार इम्तियाज जलील यांच्यासह काही संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी आंदाेलन सुरू केले आहे. याचदरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर कँडल मार्च काढण्यात आला. आंदाेलने, मोर्चांमुळे शहर पोलिस दल, गुप्तचर यंत्रणा चिंताग्रस्त झाली आहे.
काय म्हणताय उद्योजकॽ राजकीय नेते, लोकप्रतिनिधी शहर शांत ठेवण्याच्या प्रयत्नापासून अंग काढून घेत असल्याचे पाहून उद्योजक, व्यापाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर फर्स्ट (औरंगाबाद फर्स्ट) या संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे साकडे घातले आहे. डब्ल्यू- २० परिषदेदरम्यान शहरात सकारात्मक वातावरण तयार झाले, परंतु नामांतराच्या मुद्द्यांमुळे पुन्हा अशांतता निर्माण हाेत आहे.
लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु अशा अधिकारांचा वापर करताना शांतपणे जीवन जगणाऱ्यांच्या अधिकारांवर बाधा येणार नाही हे पाहणे समाजधुरिणांचे कर्तव्य आहे. त्यामुळे या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेला विराम देण्यासाठी सर्व विचारधारेच्या प्रमुखांना एकत्र बोलावून विषय मार्गी लावावा, अशी मागणी उद्याेजकांनी केली आहे.
पोलिसांचा गुप्तचर विभाग चोवीस तास अलर्टवर नामांतरामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या वक्तव्यांचा सोशल मीडियावरदेखील परिणाम होत आहे. शिवाय विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून मोर्चा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सर्व थांबवण्याची जबाबदारी एकट्या पोलिस विभागावर आली आहे. इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यापासून सोयीस्कर लांब राहण्याची भूमिका घेत आहेत. समाजकंटकांकडून या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून पोलिस विभाग चोवीस तास अलर्टवर आहे. शिवाय गुप्तचर शाखा सक्रिय झाली असून सोशल मीडिया, संघटना, पुढाऱ्यांवर लक्ष ठेवून आहे. अपुरे मनुष्यबळ, दैनंदिन कामासोबत वक्तव्य, आंदोलनामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली प्रतिमा झालीय, ती कायम ठेवा डब्ल्यू-२० परिषदेदरम्यान जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी मिळून शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली प्रतिमा तयार केली. ही प्रतिमा कायम जपली जावी. आता नामांतराच्या मतभेदांमुळे शहराचे वातावरण बिघडू शकते. याचा परिणाम थेट शहराच्या विकासावर होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. - मानसिंग पवार, माजी अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर फर्स्ट (औरंगाबाद फर्स्ट)
यापूर्वीच शहरात पाच वर्षांत चार दंगली शहरात गेल्या पाच वर्षांमध्ये चार दंगली झाल्या. परिणामी आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराची प्रतिमा खराब झाली. येणाऱ्या उद्योजकांनी नंतर पाठ फिरवली. त्यामुळे पुन्हा याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.