आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीवरून काढल्याचा राग मनात ठेवला:चालकाने मालकावर केला तलवारीने हल्ला, 19 ऑगस्‍टपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरीवरून काढल्याचा राग मनात ठेवून चालकाने कार मालकाच्‍या घरात घुसून तलवारीने हल्ला केल्याची घटना 16 ऑगस्‍ट रोजी सायंकाळी एन-३ सिडको येथे घडली. प्रकरणात कार चालक तथा आरोपी बबन ऊर्फ पाटलोबा बालाजी फड (42, रा. पांचाळ एन-6 सिडको) याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. आरोपीला 19 ऑगस्‍टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.व्‍ही. चरडे यांनी दिले.

प्रकरणात संजय कोडींबा नागरे (56, रा. एन ३, सिडको) यांनी फिर्याद दिली. त्‍यानुसार, फिर्यादीने गेल्या साडेतीन महिन्‍यांपूर्वी आरोपीला आपल्या कारवर चालक म्हणून ठेवले होते. 29 जुलै रोजी फिर्यादी व त्‍यांची पत्‍नी हे बालाजीला दर्शनासाठी जात होते. त्‍यावेळी आरोपीने दारु पित कार चालवल्याचे फिर्यादीच्‍या निदर्शनास आले. 5 ऑगस्‍ट रोजी फिर्यादी बालाजीहून घरी परतले. दुसऱ्या दिवशी आरोपीने यासाठी माफी मागितली. फिर्यादीने देखील आरोपी हा गरजू असल्याने माफ केले. मात्र पुन्हा पुन्हा असे प्रकार घडतच राहिले.

पगार देत त्‍याला कामावरुन काढले

13 ऑगस्‍ट रोजी रक्षाबंधनानिमीत्त फिर्यादी हे सुन व नातंवडासोबत कारने शिगोरी (ता. शेवगाव जि. अहमदनगर) येथे आले होते. त्‍यावेळी कार आरोपी बबन हा चालवत होता. रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर फिर्यादी हे घरी परतण्‍याच्‍या बेतात असतांना आरोपी बबन हा पुन्‍हा दारु पिऊन आला. आरोपी दारु जास्‍त प्‍यायल्याने फिर्यादीने तेथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी फिर्यादीने आरोपीला पैसे देऊन बसने औरंगाबादला येण्‍याचे सांगितले. आरोपी हा दारु पिण्‍याचा सवयीचा असल्याचे समजल्यावर फिर्यादीने त्‍याचा 13 दिवसांचा पगार देत त्‍याला कामावरुन काढून टाकले.

घरात घुसून वार

आरोपी हा फिर्यादीच्‍या मोबाइल सतत फोन करुन माझा हिशोब करा, माझे पैसे देऊन टाका असे म्हणत शिवीगाळ करत होता. 16 ऑगस्‍ट रोजी सायंकाळी फिर्यादी हे आपल्या कुटूंबासह हॉलमध्‍ये बसलेले होते. त्‍यावेळी आरोपी हा तलवार घेऊन घरात घुसला. त्‍याने सरळ फिर्यादीवर तलवारीने हल्ला केला. मात्र नागरे यांचा मुलगा सागर याने बबन फडचा हात धरल्याने त्यांचे प्राण वाचले. बबन फड याने नागरे यांना तुकडे करण्याची धमकी दिली. त्‍यावेळी फिर्यादी व त्‍यांच्‍या मुलांने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पोलिसांनी तात्काळ घटनास्‍थळी धाव घेत आरोपी बबनच्‍या मुसक्या आवळल्या. आरोपीच्‍या ताब्यातून पोलिसांनी तलवार आणि दुचाकी जप्‍त करण्‍यात आली आहे. प्रकरणात पुंडलिकनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जरीना दुरार्णी यांनी आरोपीने तलवार कोठून आणली. आरोपीला गुन्‍हा करण्‍यास कोणी चिथावणी दिली, गुन्‍ह्यात वापरलेल्या दुचाकीबाबत चौकशी करायची आहे. गुन्‍हा करण्‍यामागे नेमका उद्देश काय होता याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...