मुलाच्या उपचारासाठी बापाची धडपड, कर्फ्यूमध्ये वाहन मिळन नसल्याचे बैलगाडीतून केला वीस किलोमीटर प्रवास

  • 8 वर्षीय मुलाला अचानक उलटी आणि शौचास त्रास सुरू झाला

प्रतिनिधी

Mar 26,2020 02:53:52 PM IST

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील रिधोरा येथे आजारी मुलास उपचारासाठी सेनगाव येथे नेण्यास ॲटो चालकांना विनंती केली, एवढेच नव्हे तर गावातील दुचाकीधारकांना विनंती केली, मात्र कोणीही मदतीला आले नसल्याने अखेर गजानन खंदारे यांनी त्यांच्या मुलास बैलगाडीत बसवून वीस किलो मिटरचा प्रवास केल्याची घटना आज(दि. 26) घडली.

सेनगाव तालुक्यातील रिधोरा येथील गजानन खंदारे यांच्या आठ वर्षाच्या मुलाची तब्येत बुधवारपासून बिघडली. सायंकाळी त्यास उलटी व शाैचाचा त्रास होत होता. गावात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने खंदारे अस्वस्थ झाले. आज सकाळ होताच त्यांनी गावातील काही ॲटो चालकाकडे मुलास दवाखान्यात नेण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली. मात्र संचारबंदीमुळे अॅटो चालकांनी त्यांच्या सोबत येण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर गावातील काही दुचाकी चालकांनाही विनंती केली. मात्र त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

अखेर खंदारे यांनी सकाळीच बैलगाडी जूपूंन आठ वर्षाच्या मुलास सोबत घेऊन वीस किलो मिटरचा प्रवास करीत सेनगावचे ग्रामीण रुग्णालय गाठले. या ठिकाणी दुपारी त्यास उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याला उपचारासाठी दाखल केल्यानंतर खंदारे यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. त्यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे. मात्र या प्रकारामुळे ग्रामीण भागातूनही माणुसकी कमी होत आहे काय असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

X