आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याचा ढाण्या वाघ हरपला:शेकाप'चे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचे निधन, विधानसभेत गाजली होती भाषणे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे रविवारी दु:खद निधन झाले. ते 102 वर्षांचे होते. गत काही दिवसांपासून औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विधानसभेतील अनेक भाषणे गाजली

भाई केशवराव धोंडगे दीर्घकाळ विधिमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार व खासदार म्हणून त्यांनी लोकांचं प्रतिनिधित्व केले होते. विधानसभेतील त्यांची अनेक भाषणं प्रचंड गाजली. मराठवाड्यातील सर्वात ज्येष्ठ नेते ते होते. जनकल्याणासाठी त्यांनी अहोरात्र सेवा केली होती.

जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा नेता

जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. केशवराव धोंडगे हे पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून ते परिचित होते.

शरद पवार म्हणजे बिनचिपळ्याचे नारदच:केशवराव धोंडगे म्हणाले होते - 'शरद पवारांची बारामती म्हणजे भानामती'!

मराठवाड्याचा ढाण्या वाघ, जेष्ठ स्वतंत्र सेनानी आणि शेकापचे ज्येष्ठ केशवराव धोंडगे यांचे आज निधन झाले. त्यांचे आणि शरद पवारांचे राजकीय संबंध सर्वश्रूत आहेत. 'शरद पवारांची बारामती म्हणजे भानामती आहे. माणसं फोडण्यात पवार अत्यंत कुशल आहेत. नारदमुनीदेखील पवारांची बरोबरी करू शकत नाही. पवार म्हणजे बिनचिपळ्याचे नारदच आहेत.' संसदीय राजकारणाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नांदेडला झालेल्या सत्कार समारंभात पवारांविषयी केलेले भाष्य आजही तेवढेच चर्चेत आहे. (येथे वाचा सविस्तर)

कंधार तालुक्यात जन्म

कंधार तालुक्यातील गऊळ गावात त्यांचा जन्म झाला. पिचलेल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी ते कायम आग्रही होते. त्यांनी अनेक आंदोलने केली. सरकारला प्रश्न विचारले, प्रसंगी जनप्रश्नांसाठी जाबही विचारला होता.

जय क्रांतींच्या घोषणा

जय क्रांती’ अशी घोषणा देत विधानसभेत आपल्या ओघवत्या शैलीने भल्याभल्यांना ते गारद करीत होते. केशवराव धोंडगे यांचा शताब्दीनिमित्त विधिमंडळात काही महिन्यांपुर्वी सत्कार करण्यात आला.

केशवराव धोंडगे यांचा शताब्दीनिमित्त विधिमंडळात काही महिन्यांपुर्वी सत्कार करण्यात आला.
केशवराव धोंडगे यांचा शताब्दीनिमित्त विधिमंडळात काही महिन्यांपुर्वी सत्कार करण्यात आला.

शताब्दीच्या वेळी त्यांचा सत्कार करण्याची योजना होती, पण करोनामुळे दोन वर्षे हा कार्यक्रम लांबणीवर पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अशी होती राजकीय कारकिर्द

केशवराव धोंगडे यांनी खासदारपदी एकवेळ आणि आमदारपदी पाचवेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. निर्भीड आणि स्वाभिमानी प्रामाणिक बाणा ही त्यांची ख्याती होतीच पण तो त्यांनी कधीच सोडला नाही. विधानसभेचं कामकाज सुरु होण्याआधी ते सभागृहात हजर असत. तर विधानसभा संपल्या नंतर सर्वात शेवटी ते तिथून निघत हे त्यांचं वैशिष्ट्य!

आणीबाणीविरोधात लढा

  • डॉ. केशवराव धोंडगे यांच्या नेतृत्वाखालील आणीबाणी विरोधी लढा लढला गेला.
  • नाशिक सेंट्रल कारागृहामध्ये 14 महिने कारावास भोगत स्वाभिमानी बाणा दाखवला.
  • 1985 साली गुराखीगड स्थापन करुन जागतिक गुराखी साहित्य संमेलन आणि जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलन भरवून अनोखा विक्रम केला.
  • रेकॉर्डब्रेक जवळपास हजारो सत्याग्रह विविध नाव देवून यशस्वी केले. त्यात पिंडदान सत्याग्रह, बोंबल्या सत्याग्रह, शेणचारऊ सत्याग्रह, खईस कुत्री सत्याग्रह ठळक आहेत.
बातम्या आणखी आहेत...