आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएलपीजी गॅस सिलिंडरची तपासणी न करता पैसे घेऊन प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या केजीएन सेंटरचा परवाना आता आरटीओने तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे. ‘दिव्य मराठी’ने १४ जून रोजी याविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली. केजीएनच्या कर्मचाऱ्यांवर सात दिवसांत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे. शहरातील एलपीजी गॅस सिलिंडर वाहनांची संख्या तीस हजारांवर जाऊन पोहोचली आहे. मात्र, गॅसवर वाहन चालवणे बॉम्ब सारखेच धोकादायक आहे. त्यामुळे दर पाच वर्षांनी वाहनांना सिलिंडरची हायड्रोटेस्टिंग अनिवार्य केली आहे. मात्र, हायड्रोटेस्टिंग सेंटरचालक सिलिंडरची तपासणी न करता पैसे घेऊन प्रमाणपत्र देत असल्याचे दिव्य मराठीने उघडकीस आणले होते. आरटीओ विभागातील अधिकारी एलपीजी सिलिंडरची तपासणी कधी झाली, पेंट, लोगो आदींचे वास्तव बघत नाहीत. विना तपासणी पैसे देऊन घेतलेले बोगस प्रमाणपत्र बघून वाहनाची पासिंग करतात. यामुळे प्रवासी, नागरिकांची सुरक्षा वेशीवर टांगली जात असल्याचे स्पष्ट झाले होते.
व्यावसायिक प्रमाणपत्रधारकांची कबुली : केजीएन सेंटरचे मालक नबी उमर खान पठाण यांनी कबूल केले की, एजन्सीचे कर्मचारी बाहेरच्या बाहेर वाहनांचे प्रमाणपत्र बनवून देत होते. याविषयी मला माहिती नव्हती. दिव्य मराठीत बातमी आल्यानंतर गैरप्रकार सुरू असल्याचे कळाले. असे प्रमाणपत्र देणाऱ्यांविरुद्ध सात दिवसांच्या आत पोलिसांत तक्रार दाखल केली जाईल. कमीत कमी कारवाई करावी अशी विनंती आरटीओंना केली होती. त्यानुसार आरटीओंनी तीन महिन्यांसाठी (२४ आॅक्टबरपर्यंत) परवाना क्रमांक एमएच २० टीसी ११०२ निलंबित केला आहे. पोलिस कारवाई करण्याबाबतही आरटीओ संजय मैत्रेवार यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.