आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार फोडले:खैरेंच्या दाव्याने खळबळ; 'महाशक्ती'च्या प्रयोगाची पुन्हा चर्चा, पण टीकेनंतर वक्तव्य घेतले मागे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार फोडले आहेत. सध्या काँग्रेस जोडो यात्रेमुळे ते शांत आहेत, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण रंगणार का, या चर्चेला उधाण आलेय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खैरेंना स्वतःचा पक्ष सांभाळा असे उत्तर दिले आहे. तर सतेज पाटील यांनी खैरेंनी आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. त्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी कुणाची मने दुखावली असतील, तर दिलगिरी व्यक्त करत वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले आहे. मात्र, खरेच शिंदे यांनी उल्लेख केलेली 'महाशक्ती' पुन्हा असा प्रयोग करणार का, याचीच चर्चा सुरूय.

काय म्हणाले खैरे?

शिवसेना फुटली. एक-दोन नव्हे, तर तब्बल चाळीस आमदार बाहेर पडले. राज्यात सत्तांतर घडले. त्यानंतरही फोडाफोडाची चर्चा थांबायला तयार नाही. आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय. प्रसारमाध्यमांशी बोलताना खैरे यांनी असा दावा केला आहे की, सरकार पडू नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत. शिंदे गटाचे सोळा आमदार जातील. मात्र, त्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याची तयारी आमजे जुने मित्र देवेंद्र फडणवीसांनी करून ठेवलीय. काँग्रेसची मोठी भारत-जोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे ते शांत राहिले आहेत.

'ते' सगळे पडणार

खैरे पुढे म्हणतात की, शिंदे यांचे चाळीस आमदार निवडून येणार नाहीत. भुजबळांसारखा माणूस पडतो. नारायण राणेंसारखा माणूस पडतो. मग हे कोण आहेत. आज त्यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. आता पैसा गौण आहे. शेवटी लोक पाहतात कोणी खोके घेतले, कोणी काय केले ते. ठाण्यात ताकद होती तर आमचे ठाण्याचे सरकार त्यांच्याकडे का गेले नाहीत. अनेक ठिकाणी मुख्यमंत्री पडले आहेत. हे पण पडतील, असा दावाही त्यांनी केलाय.

सत्तारांना म्हटले सरडा

खैरे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवरही जोरदार टीका केली आहे. सत्तार आमच्या ताकदीमुळे निवडून आले. उद्धव ठाकरेंपुढे त्यांनी मला निवडून आणा म्हणून हात जोडले. सत्तार हा रंग बदलणारा सरडा आहे, अशी विखारी टीकाही त्यांनी यावेळी केली.

पटोलेंचे उत्तर

खैरेंच्या वक्तव्याचा काँग्रेसमधून सतेज पाटील यांनी समाचार घेतला. खैरेंनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर ज्यांचा स्वतःचा पक्ष फुटला आहे, अशा लोकांनी आमच्याबाबत बोलू नये, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. मात्र, या टीकेनंतर चंद्रकांत खैरे यांनी कुणाची मने दुखावली असतील, तर दिलगिरी व्यक्त करत वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...