आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘पन्नास खोके’ हे वादग्रस्त रॅप गाणे सोशल मीडियावर प्रसारित करणारा छत्रपती संभाजीनगरचा गायक राज मुंगसेविरुद्ध ठाणे जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरुवारी पोलिसांनी त्याला अटक केली. शिंदे सरकारची बदनामी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. राज मुंगसे याने ‘चोर आले पन्नास खोके घेऊन’ हे रॅप गाणे सोशल मीडियावर प्रसारित केले होते. हे गाणे दीड मिनिटाचे असून या गाण्याला १०-१२ दिवसांतच ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या गाण्यात ‘चोर’ आणि ‘पन्नास खोके’ हे आक्षेपार्ह शब्द असल्याने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथच्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंुगसेविरोधात तक्रार दिली होती.
राजशी संबंध नसल्याचा कुटुंबीयांचा दावा
तीन वर्षांपासून राजशी संबंध नसल्याचा दावा मुंगसे कुटुंबीयांनी केला आहे. त्याने छत्रपती संभाजीनगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागात प्रवेश घेतला असून तो तिथेच वसतिगृहात राहत असल्याचे त्याच्या भावाने सांगितले. राजचे आई-वडील आणि भाऊ मजुरी करतात. पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे नातवाइकांकडून कळल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र त्याला अटक केली अथवा कसे याबाबत माहिती नसल्याचे कुटुंबीयांनी स्पष्ट केले.
मानहानीसह तीन कलमे लावली
अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय दंड विधान कलम ५०१ (मानहानी), ५०४ ( हेतुपुरस्सर शांतता भंग करण्याचा उद्देश) आणि ५०५ ( विविध गटांत वैमनस्य निर्माण करणारी वक्तव्ये) अशी तीन कलमे लावली आहेत.
राज तिसगावचा रहिवासी, १५ मिनिटांत पाेलिस घरी
तो मूळचा छत्रपती संभाजीनगरनजीक तिसगावचा राहणारा असून त्याला अटक केल्याची माहितीही राष्ट्रवादी नेते आव्हाड यांनी सोशल मीडियावर दिली. गुरूवारी राजने गाण्याची लिंक शेअर करताच एमआयडीसी वाळूज ठाण्याचे पोलिस १५ मिनिटात तिसगावला पाेहाेचले. परंतु ताे तेथील घरी नव्हता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.