आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलींनी 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत मिळवलेल्या विजेतेपदासह महाराष्ट्राने रविवारी पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या ॲथलेटिक्स प्रकारात शेवटच्या दिवसाची सोनेरी सांगता केली. त्याबरोबर महाराष्ट्राला रविवारी महेश जाधवने लांब उडीत रौप्यपदक, श्रावणी देसावळेने उंच उडीत रौप्यपदक तर रिया पाटीलने 800 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवून दिले.
महिलांच्या रिले शर्यतीत ईशा जाधव, वैष्णवी कातुरे, रिया पाटील व अनुष्का कुंभार यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. त्यांनी बॅटन बदलताना देखील चांगला संयम दाखवला. हे अंतर त्यांनी 3 मिनिटे 52 सेकंदात पार केले.
दुसरीकडे, इस्लामपूर येथील खेळाडू श्रावणीने उंच उडीत 1.63 मीटर्स पर्यंत उडी घेत पदक जिंकले. मुलांमध्ये महेश जाधवने लांब उडीत 7.11 मीटर उडी घेत रौप्य जिंकले. त्याआधी त्याने महाराष्ट्रात 4 बाय 100 मीटर शर्यतीतही रौप्यपदक मिळवले आहे. मुलींच्या 800 मीटरमध्ये कोल्हापूरच्या रिया पाटीलने 12.56 सेकंदाचा वेळ घेत कांस्यपदक पटकावले.
महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाची विजय सलामी
राष्ट्रीय खेळाडू वैभव रबाडेच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने दमदार सुरुवात केली. रेडर अजित चौहान (13 गुण), जयेश महाजन (5 टॅकल पॉईंट्स) आणि अनुज गाढवे (5 टॅकल पॉईंट्स) यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाने सलामी सामन्यात बिहारचा 38-32 गुणांनी पराभव केला.
दुसरीकडे, निकिता लंगोटेच्या नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघाला गटातील पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. हरियाणा संघाने सलामी सामन्यात महाराष्ट्रावर 41-25 अशाप्रकारे मात केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाचा दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न अपुरा ठरला.
मंगळवारपासून तलवारबाजी स्पर्धा
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेबरोबरच नॅशनल गेम्स गाजवणारे महाराष्ट्राचे युवा फेन्सर आता मध्य प्रदेशमध्ये आयोजित खेलो इंडियामध्ये आपल्या सोनेरी यशाने लक्षवेधी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कसून सराव आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर महाराष्ट्राची तलवार खेलो इंडियाचे पदार्पणात सोनेरी यशाने चमकणार असल्याचे चित्र दिसते. यंदा नव्यानेच तलवारबाजी या इव्हेंटचा खेलो इंडिया मध्ये समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र संघाची कामगिरी आतापर्यंत लक्षवेधी ठरलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राचे युवा फेंसर या पदार्पणात खेलो इंडिया स्पर्धा किताब जिंकून गाजवतील, असा विश्वास प्रशिक्षक चंद्रशेखर घुगे आणि स्वप्निल तांगडे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे 29 सदस्यीय पथक स्पर्धेसाठी जबलपूरला दाखल झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.