आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया युवा स्पर्धा:महाराष्ट्राने 45 सुवर्णपदकांसह पटकावले उपविजेतेपद, खो-खो मुलामुलींच्या संघाचे सुवर्ण जिंकत दुहेरी धमाका

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला (हरियाणा) येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने शानदार कामगिरी बजावत एकूण 125 पदके जिंकत उपविजेतेपद पटकावले. या त 45 सुवर्ण, 40 रौप्य व 40 कांस्यपदकांचा समावेश आहे. यजमान हरियाणा संघाने 137 पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. कर्नाटक संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सोमवारी महाराष्ट्राने 3 सुवर्ण व 1 कांस्यपदक मिळवत शेवट गोड केला. बाँक्सिंगमध्ये सुरेश विश्वकर्माने सुवर्णपदक आपल्या नावे केला. पंचकुलातील इंद्रप्रस्थ अँडिटोरियम येथे हरियाणाचे राज्यपाल बंडारू लक्ष्मण, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, हरियाणाचे क्रीडामंत्री निशित प्रामाणिक यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा समारोप करण्यात आला.

महाराष्ट्राला आज 3 सुवर्ण

खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मयुरी, जान्हवी, ऋषीकेश, रामजीची मोलाची कामगिरी बजावली आहे. मुलींच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने ओरिसावर अवघ्या 1 गुणांनी विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्राने 21-20 (8-6, 7-9, व अतिरिक्त डावात 6-5) बाजी मारली. महाराष्ट्राच्या कर्णधार जान्हवी पेठे (1:35, 2:20 मि. संरक्षण ), प्रीती काळे (1:45, 2:40 मि. संरक्षण व 2 गुण ), संपदा मोरे (1:30, 1:40 मि. संरक्षण व 6 गुण) व वृषाली भोये (4 गुण) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. सुवर्ण कामगिरीची नोंद केली. ओरिसाच्या स्मरणिका साहू, अनन्या प्रधान यांचे प्रयत्न अपुरे पडले.

मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओरिसाला 14-11 असा एक डाव 3 गुणांनी हरवत सुवर्ण कामगिरी साधली.

या सामन्यात शुभम थोरात (2 मि. संरक्षण व 2 गुण), नरेंद्र कातकडे (2 मि. संरक्षण व 2 गुण), ऋषीकेश शिंदे (2 मि. संरक्षण) व रामजी कश्यप (1:50 मि. संरक्षण व 4 गुण) यांनी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

टेबल टेनिसमध्ये दिपीत पाटीलला कांस्यपदक

टेबल टेनिस प्रकारात महाराष्ट्राचा युवा खेळाडू दिपीत पाटीलने कांस्यपदक पटकावले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत दिपीतने दिल्लीच्या आदर्श छेत्रीला 4-3 ने पराभूत करत पदकिय कामगिरी साधली.

बातम्या आणखी आहेत...