आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुवर्णपदकाच्या दावेदार असलेल्या पृथा वर्टीकर व जेनिफर वर्गीस यांनी टेबल टेनिस मधील महिलांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावत महाराष्ट्राचे पदकांचे खाते उघडले. विशेष म्हणजे या विभागातील रौप्यपदक महाराष्ट्राच्याच तनिषा कोटेचा व रिशा मिरचंदानी यांना मिळाले. पुरुषांच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या जश मोदी व नील मुळ्ये यांनी कांस्यपदकाची कमाई केली.
महिलांच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या जोड्यांनी अंतिम फेरी गाठल्यामुळे दोन्ही पदके महाराष्ट्राला मिळणार हे निश्चित झाले होते. फक्त उत्सुकता होती कोणती जोडी आणि कशी जिंकणार याचीच. पृथा व जेनिफर यांनी तनिषा व रिशा यांचा 13-11, 11-9,11-7 असा पराभव केला. तीनही गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी परतीचे फटके, चॉप्स, काउंटर ॲटॅक असा सुरेख खेळ केला आणि चाहत्यांना खेळाचा आनंद मिळवून दिला.
पुरुष गटात कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत मोदी व मुळ्ये यांनी पश्चिम बंगालच्या अंकुर भट्टाचार्य व सौम्यदीप सरकार यांचा पराभव केला. सुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या या जोडीने हा सामना 11-6, 11-5, 11-8 असा जिंकला. कास्यपदक मिळवल्यानंतर मोदी व मुळ्ये यांनी सांगितले,"महाराष्ट्राकरिता पदक मिळविल्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटत आहे. आम्ही सराव शिबिरात भरपूर सराव केल्यामुळे आम्हाला एकमेकांच्या खेळाचा अभ्यास होता आणि त्याप्रमाणे आम्ही या सामन्यात समन्वय ठेवण्यात यशस्वी झालो."
टेबल टेनिसपटूंचे कौतुक
महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक व ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू सुनील बाब्रस यांनी खेळाडूंचे कौतुक करत सांगितले,"आमच्या खेळामध्ये पदके मिळवणार याची आम्हाला खात्री होती आणि त्याची पूर्तता आमच्या खेळाडूंनी केली. संघातील सर्वच खेळाडू अतिशय नैपुण्यवान आहेत याचा प्रत्यय त्यांनी घडवून दिला आहे.
आपल्याच सहकाऱ्यांशी खेळण्याचा आनंद
सामना संपल्यानंतर पृथा व जेनिफर यांनी सांगितले,"विजेतेपदाची खात्री होती परंतु आमच्याच सहकाऱ्यांविरुद्ध अंतिम सामना होईल, अशी आम्ही अपेक्षा केली नव्हती.
अर्थात अंतिम सामन्यात आमच्याच सहकारी प्रतिस्पर्धी होत्या त्यामुळे आम्हाला देखील खेळाचा आनंद घेता आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.