आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवा कर्णधार नरेंद्र कातकडे, आदित्य कुडाळे आणि निखिल यांनी सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरी करत सोनेरी यशाची घोडदौड कायम ठेवली. महाराष्ट्राचा खो-खो संघ पाचव्या सत्रातील खेलो इंडियामध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. यासह महाराष्ट्र संघाने आपले निर्विवाद वर्चस्व राखत सलग पाचव्यांदा चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्राने फायनलमध्ये शुक्रवारी दिल्ली संघाला 38-28 गुणांनी धूळ चारली.
यादरम्यान नरेंद्रने चार गडी बाद करत 1:30 मिनिटे पळतीचा खेळ केला. तसेच निखिलने 4 गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. यादरम्यान महाराष्ट्र महिला खो-खो संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत ओडीसा विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. चार वेळेच्या गत विजेत्या महाराष्ट्राचा 16-13 ने पराभव झाला.
महाराष्ट्राची नाईशा ठरली रौप्य पदकाची मानकरी
14 वर्षीय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू नाईशा कौरने शुक्रवारी खेलो इंडियात महाराष्ट्र संघाला रौप्यपदकाचा बहुमान मिळवून दिला. ती महिला एकेरीच्या गटामध्ये उपविजेती ठरली. अव्वल मानांकित देविकाने एकेरीच्या फायनलमध्ये महाराष्ट्राच्या नाईशाचा पराभव केला. तिने 14-21, 21-19,21-10 अशा फरकाने अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. महाराष्ट्राची युवा बॅडमिंटनपटू नाईशा पदार्पणात स्पर्धेत पदकाची मानकरी ठरली.
आर्या व वैष्णवीला कांस्यपदक
बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राच्या उमर अन्वर शेख, उस्मान अन्सारी, कुणाल घोरपडे (औरंगाबाद साईचा खेळाडू) व देविका घोरपडे यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवत सुवर्णपदकाच्या आशा कायम ठेवल्या. महाराष्ट्राच्या आर्या बारटक्के व वैष्णवी वाघमारे यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 48 किलो गटात उमर शेखने चुरशीच्या लढतीनंतर हरियाणाच्या विश्वेश कुमारला पराभूत केले. 51 किलो गटात उस्मान अन्सारीने मध्यप्रदेशच्या अनुराग कुमार स्पर्धेतून बाहेर केले. 67 किलोत कुणालने यजमान प्रशंसन कुमारला सहज पराभूत केले.
देविकाचा एकतर्फी विजय
जागतिक कनिष्ठ गट सुवर्णपदक विजेते खेळाडू देविका घोरपडेने आंध्र प्रदेशच्या मेहरून्निसा बेगमला तीन मिनिटातच निष्प्रभ करत एकतर्फी विजय मिळविला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. 57 किलोत साताऱ्याच्या आर्याला अटीतटीच्या लढतीत उत्तर प्रदेशच्या अनामिका यादवकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला.
पुण्याची खेळाडू वैष्णवीला 60 किलो गटात मणिपूरच्या टी. कुंजुराणी देवी कडून पराभव पत्करावा लागला. वैष्णवी ही माजी ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे यांच्या अकादमी सराव करत आहे. आर्या व वैष्णवी यांचे खेलो इंडियातील हे पहिलेच पदक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.