आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या वीणाने आहेरने एकूण 129 किलो वजन उचलून सुवर्णपदकाचा मान मिळविला. तिने स्नॅचमध्ये 57 किलो आणि क्लिन ॲण्ड जर्क प्रकारात 72 किलो वजन उचलत तिसऱ्या प्रयत्नात आपली सर्वोत्तम कामगिरी केली. वीणाने पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युवा स्पर्धेत क्लीन अॅण्ड जर्क प्रकारात आपली कामगिरी उंचावताना थेट राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली.
वीणाने आकांक्षा व्यवहारेच्या 71 किलो वजनाचा विक्रम एका किलोने मोडीत काढला. आकांक्षाने गेल्यावर्षी मोदीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या विक्रमाची नोंद केली होती. आंकाक्षा या वेळी 45 किलो वजन गटात सहभागी झाली आहे. वीणाने दुसऱ्या क्रमांकावरील ज्योत्स्ना साबर (118) आणि प्रितीस्मिता भोज (117) या ओडिशाच्या दोघींना मोठ्या फरकाने मागे टाकले.
महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाच्या विजयी मोहिमेला ब्रेक
कबड्डी प्रकारात राजस्थान संघाने सोमवारी महाराष्ट्र संघाच्या विजय मोहिमेला ब्रेक लावला. राजस्थानने अवघ्या एका गुणाच्या आघाडीने महाराष्ट्रावर मात केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला गटातील दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थान संघाने 28-27 अशा एका गुणाच्या आघाडीने रोमहर्षक विजय संपादन केला. त्यामुळे वैभव रबाडेच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघाचा गटात पहिला पराभव झाला आहे. त्यामुळे वैभव आणि दादासो पुजारी यांची चमकदार कामगिरी व्यर्थ ठरली.
नेमबाजीत सानियाचा कांस्यपदकाचा वेध
कोल्हापूरच्या गारगोटी येथील खेळाडू सानिया सापलेने 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशन या प्रकारात कांस्यपदकाचा वेध घेतला. सानियाचे खेलो इंडिया मधील हे पहिलेच पदक आहे. आतापर्यंत झालेल्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये तिने जवळजवळ पन्नास पदकांची कमाई केली आहे.
ती कोल्हापूर आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणी वैयक्तिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. ती कोल्हापूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. अभियांत्रिकी व नेमबाजी या दोन्ही क्षेत्रात तिला करिअर करायचे आहे. महाराष्ट्राला नेमबाजीत येथे एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी एकूण चार पदकांची कमाई झाली.
स्लॅलम प्रकारात अपयशी सुरुवात
महाराष्ट्राला साहसी क्रीडा प्रकारातील स्लॅलम (कॅनॉइंग-कयाकिंग) मध्ये अपयश आले. या स्पर्धा प्रकारात महाराष्ट्र प्रथमच सहभागी झाला होता. महाराष्ट्राची मनस्वी राईकवारने 724.976 सेकंद अशी वेळ देत सहाव्या स्थानावर राहिली.
यजमान मध्य प्रदेशाच्या मानसी बाथमने सुवर्ण, तर हरियानाच्या प्रिती पालने रौप्य आणि कर्नाटकाच्या धरिती मारियाने कांस्यपदक मिळवले. या प्रकारातील दुसऱ्या म्हणजे कयाकिंगमध्ये उद्या जान्हवी राईकवार आपले कौशल्य पणाला लावणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.