आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा:दिया चितळे व अपेक्षा फर्नांडिसने पटकावले सलग दुसरे सुवर्ण, खो-खोचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला (हरियाणा) खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत रविवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चार सुवर्णपदके आपल्या खात्यात जमा केले. सायंकाळच्या सत्रात टेबल टेनिसपटू दिया पराग चितळे आणि जलतरणपटू अपेक्षा फर्नांडिसने या दोघांनी सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर, खो-खो स्पर्धेत मुलामुलींच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश करत पदक निश्चित केले. महाराष्ट्राने रविवारी पदकाचे शतक पूर्ण केले.

जलतरण प्रकारात महाराष्ट्राच्या अपेक्षाने 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील तिचे हे एकूण तिसरे पदक ठरले. गेल्या दोन दिवसांत अपेक्षाने 200 मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात सुवर्णपदक आणि 4 बाय 100 मीटर रिले प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे. तिने स्पर्धेत आपला दबदबा राखला.

टेबल टेनिस : दियाचे एकेरीत यश

टेबल टेनिसपटू दियाने मुलींच्या एकेरी गटात सोनेरी यश मिळवले. तिने लक्षिता नारंगला 4-3 गेमने पराभूत करत बाजी मारली. लक्षिताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शनिवारी दुहेरीमध्ये दियाने हरियाणाच्या जोडीला हरवत सुवर्ण जिंकले होते. तिचे या स्पर्धेत दुसरे पदक ठरले. त्याचबरोबर पुढील जुलै महिन्यात लंडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी दियाची भारतीय संघात निवड झाली आहे. खेलो इंडिया स्पर्धा तिच्या तयारीसाठी महत्वाची ठरली. दोन सुवर्णपदकामुळे तिचा आत्मविश्वास वाढला असेल.

खो-खो : मुलांनी दिल्लीला केले पराभूत

खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्या महाराष्ट्राच्या मुलींनी पश्चिम बंगालाला 9-8 (9-3) असा एक डाव 1 गुणाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. यात प्रिती काळे, मयुरी पवार, जान्हवी पेठे, दिपाली राठोड यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मुलांच्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या मुलांनी दिल्लीच्या संघाला 15-9 (15-5) असा 1 डाव 6 गुणांनी हरवत फायनल गाठली. ऋषिकेश शिंदे, अक्षय तोगरे, आदित्य कुडाळे यांनी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

बातम्या आणखी आहेत...