आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया युवा स्पर्धा:बाॅक्सिंगमध्ये सोनेरी हॅटट्रिकसह महाराष्ट्राचा पदकांचा षटकार; सायकलिंग अन् जिम्नॅटिक्समध्ये यश

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुणाल घोरपडे, उमर अन्वर शेख, देविका घोरपडे यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने बॉक्सिंग स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी चार पदकांची कमाई करत या खेळातील पदकांचा षटकार पूर्ण केला. महाराष्ट्राच्या उस्मान अन्सारीला मात्र रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भोपाळ येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राला मुलांच्या सांघिक विभागात तिसरे स्थान मिळाले.

पुण्याची जागतिक युवा सुवर्णपदक विजेती खेळाडू देविका हिने 52 किलो गटाच्या अंतिम फेरीत मध्य प्रदेशच्या काफी कुमारीचा सहज पराभव केला. देविकाने शांतपणे ही लढत खेळली व विजयश्री संपादन केली. मुलांच्या 48 किलो गटात उमर शेखने पंजाबच्या गोपी कुमारचा दणदणीत पराभव केला. आक्रमक ठोसेबाजी व भक्कम बचाव असा दुहेरी तंत्राचा उपयोग करत त्याने गोपी याला निष्प्रभ केले. 71 किलो गटात कुणालच्या पुढे हरियाणाच्या साहिल चौहानचे कडवे आव्हान होते. कुणालने सुरुवातीपासूनच कल्पकतेने ठोसेबाजी केली आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला रोखून धरले. उमर, कुणाल, देविका व कांस्यपदक विजेती वैष्णवी वाघमारे हे पुण्याचे चारही खेळाडू ऑलिंपिकपटू मनोज पिंगळे यांच्या अकादमीचे खेळाडू आहेत.‌ मुलांच्या 51 किलो गटात उस्मान अन्सारीला मणिपूरच्या एम. जादूमनी सिंग विरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला.

सायकलिंग : पुजा, संज्ञाची पदकाची हॅटट्रिक

महाराष्ट्राच्या गुणवंत सायकलिस्ट पुजा दानाेळे आणि संज्ञा पाटीलने आपला वेलाेड्रॅमवरील दबदबा कायम ठेवताना खेलाे इंडिया युथ गेम्समध्ये पदकाची हॅटट्रिक साजरी केली. पुजाने केरीन रेस प्रकारामध्ये कांस्यपदक पटकावले. त्यापाठाेपाठ याच गटामध्ये संज्ञा ही राैप्यपदक विजेती ठरली.

यातून पुजाच्या नावे यंदाच्या स्पर्धेत तिसऱ्या पदकाची नाेंद झाली आहे. काेल्हापूरच्या संज्ञानेही स्पर्धेत प्रत्येकी 1 सुवर्ण, राैप्य आणि कांस्यपदक जिंकले आहे. येत्या बुधवारपासून जबलपूरमध्ये राेड रेस इव्हेंट हाेणार आहे. यादरम्यान त्यांचा सहभाग आहे.

जिम्नॅस्टिक्समध्ये सारा राऊळला सुवर्णपदक

जिम्नॅस्टिक्समधील मुलींच्या सर्वसाधारण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या सारा राऊळने 39.334 गुणांची कमाई करत सोनेरी कामगिरी साधली. तिचीही पहिलीच खेलो इंडिया स्पर्धा आहे. तिची सहकारी रिया केळकर हिला मात्र पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

मुलांच्या फ्लोअर एक्झरसाईज प्रकारात आर्यन दवंडेने 12.033 गुणांसह रौप्य जिंकले. रिदमिकमध्ये संयुक्त काळेने (95.25 गुण) रौप्यपदक मिळवले.

बातम्या आणखी आहेत...