आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:20 हजार रुपयांच्या खंडणीसाठी घाटीतून रुग्णाच्या नातलगाचे भरदिवसा अपहरण

औरंगाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच आरोपी अटकेत, अवघ्या पाच तासांत पोलिसांनी केली यशस्वी कारवाई

अदलाबदल झालेला माेबाइल परत देण्याच्या बहाण्याने आलेल्या चार आराेपींनी घाटीतून एका रुग्णाच्या तरुण नातलगाचे अपहरण केेले. गुरुवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली. अपहृत व्यक्तीला जिवंत सोडण्यासाठी त्यांनी त्याच्या भाच्याला कॉल करून २० हजार रुपयांची मागणीही केली. मात्र पाेलिसांनी तातडीने तपास करत पाचच तासांत अपहरणकर्त्यांना अटक केली. सिकंदर मुकीम पठाण (३५), त्याचे वडील मुकीम फकीरचंद पठाण (७०), सिकंदरचा मुलगा शाहरुख (२१), ईश्वर विठ्ठल दिशागच (२९, सर्व रा. मिसारवाडी), शाहरुख सिकंदर पठाण (१८, रा. धामणगाव) अशी आराेपींची नावे आहेत. या कटात एका अल्पवयीन मुलाचादेखील सहभाग होता.

जालना जिल्ह्यातील चापानेर येथील रमेश पवार यांच्यावर घाटीत दीड महिन्यापासून उपचार सुरू आहेत. त्यांचा मुलगा विष्णू व विष्णूचा मामा कृष्णा रघुनाथ वाघ हे रुग्णासाेबत थांबले होेते. ९ जून रोजी मामा कृष्णा हे दूध आणण्यास गेले हाेते, तर विष्णू वडिलांजवळ थांबला होता. हाॅटेलजवळ ७० वर्षीय व्यक्ती मुकीम कृष्णा यांना भेटले. आपला माेबाइल खराब झाला असल्याचे सांगून फाेन करण्यासाठी त्याने कृष्णा यांचा मोबाइल मागितला. कृष्णा यांनी लवकर दिला नाही म्हणून त्या वृद्धाने अापला मोबाइल त्यांच्याकडे ठेवण्यासाठी देत त्यांचा मोबाइल स्वत:कडे घेतला. बोलण्याच्या नादात वृद्ध व्यक्ती कृष्णा यांचा मोबाइल घेऊन निघून गेली. कृष्णा यांनी विष्णूला हा प्रकार सांगितला. विष्णूने तत्काळ वृद्धाने कृष्णा यांना दिलेल्या माेबाइलवरील शेवटचा नंबर डायल केला. तो काॅल सिकंदरने उचलला. झालेला प्रकार एेकून घेतल्यानंतर सिकंदरने कृष्णा यांना मोबाइल घेण्यासाठी टीव्ही सेंटर येथे बोलावले. कृष्णा तत्काळ गेले मात्र तेथे त्यांना कोणीही भेटले नाही.

आधी टीव्ही सेंटरवर बाेलावले, नंतर घाटीत येऊन धमकावले : १० जून रोजी सकाळी दहा वाजता कृष्णा यांच्या माेबाइलवर सिकंदरने कॉल केला. माझे वडील घरी आलेत, तुम्ही आता या अन‌् तुमचा माेबाइल घेऊ जा, असे सांगितले.

मात्र कृष्णा यांनी सिकंदरलाच घाटीत बोलावले. परंतु, दहा मिनिटांनी सिकंदरने पुन्हा कॉल करून माझ्या वडिलांना टीव्ही सेंटर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तुम्ही त्यांना मारहाण केली व २० हजार रुपये व मोबाइल हिसकावले असा आराेप सिकंदरने केला. कृष्णा यांनी आरोप नाकारला. त्यावर सिकंदर व इतर दोघे घाटीत दाखल झाले. पुन्हा आरोप करत कृष्णा यांना बळजबरीने मकई गेटच्या दिशेने घेऊन गेले. या प्रकाराने घाबरलेला विष्णू वडिलांकडे गेला. पंधरा मिनिटांमध्ये त्याला कॉल आला. फोन पे वर वीस हजार रुपये पाठव अन्यथा तुझ्या मामाला जिवे ठार मारू, अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिली. विष्णूने मामासोबत बोलण्याची मागणी केली तेव्हा मामाही घाबरलेले जाणवले. पैसे नाही दिले तर हे ठार मारतील असे ते विष्णूला म्हणाले.

दहा हजार रुपये मिळताच आराेपींनी साेडले : विष्णूने बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांना घटना सांगितली. भंडारे यांनी तत्काळ उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त विवेक सराफ यांना हा प्रकार कळवला. त्यानंतर खाटमोडे यांनी तत्काळ तीन तपास पथके नेमली. आरोपींनी पैशांच्या मागणीसाठी पुन्हा कॉल केल्यानंतर तांत्रिक तपास सुरू झाला. तोपर्यंत आरोपींना विष्णूने दहा हजार रुपये आराेपींना पाठवले. तोपर्यंत एक पथक टीव्ही सेंटरकडे रवाना झाले. दहा हजार प्राप्त होताच संशय आल्याने अपहरणकर्त्यांनी कृष्णा यांना सोडून पोबारा केला होता. कृष्णा यांनी जैस्वाल हॉल जवळून एका रिक्षाचालकाच्या मदतीने विष्णूला संपर्क केला. पोलिसांनी कृष्णा यांच्याकडून अपहरणकर्त्यांचे वर्णन माहिती करून घेतले. तसेच माेबाइल लाेकेशन व तांत्रिक तपासाच्या मदतीने चौघांना काही तासांत अटक केली.

गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख, बेगमपुऱ्याचे पोलिस नाईक देवा सूर्यवंशी, सय्यद शकील, शेख हैदर, शरद नजन, सिटी चौकचे देशराज मोरे, अभिजित गायकवाड, संतोष संकपाळ आणि गुन्हे शाखेचे सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, किरण गावंडे, नितीन देशमुख, धर्मराज गायकवाड, तात्याराव शिनगारे, ओमप्रकाश बनकर यांनी आरोपींना अटक केली.

दारू पिताना बापलेकांना पकडले
विष्णूने आॅनलाइन पाठवलेले दहा हजार रुपये आराेपींनी जाधववाडीतील एक दुकानदाराकडे गयावया करून कॅश करून घेतले. हे कळताच पाेलिस तिकडे पाेहाेचले. तोपर्यंत सुटका झालेल्या कृष्णा यांना सोबत घेत दुसऱ्या पथकाने त्याच परिसरात अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. आरेापींनी दहा हजार रुपयांपैकी साडेनऊ हजार रुपये घरी दिले व ५०० रुपये घेऊन बापलेक दारू प्यायला बसले हाेते. पाेलिसांनी टीव्ही सेंटर भागातून सिकंदर व त्याच्या वडिलास ताब्यात घेतले. त्यांचे इतर तीन सहकारीही काही वेळातच हाती लागले. वडील, मुलगा व नातवाचा अपहरणाच्या कटात सहभाग पाहून पोलिसही चक्रावले. सिकंदरवर यापूर्वी किरकोळ गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...