आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा-विदर्भासारख्या उष्ण भागात अज्ञात कारणाने होणाऱ्या किडनीच्या आजारांचा धोका वाढला आहे. तासन्तास कडक उन्हात काम करताना पाणी न पिल्याने क्रॉनिक किडनी डिसिसेज ऑफ अननोन इटिओलॉजी म्हणजेच सीकेडीयू हा आजार श्रमजीवी वर्गात बळावला आहे. औरंगाबाद, जालना व अकोल्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. मधुमेेह, किडनी स्टोन, स्थूलता आणि रक्तदाब ही मूत्रपिंडाच्या विकारासाठी रिस्क फॅक्टर असतात. याव्यतिरिक्त होणाऱ्या किडनीच्या आजारांना सीकेडीयू असे म्हटले जाते. १९९९ मध्ये याचा जगातील पहिला रुग्ण आढळला. विशिष्ट लक्षणे व कारणे माहिती नसल्याने सीकेडीयू गंभीर असल्याचे औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयाचे नॅफ्रोलॉजी विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी सांगितले.
किडनी विकाराच्या ५६० रुग्णांपैकी ४० टक्के रुग्णांना सीकेडीयू आजार
मराठवाडा, विदर्भाचे उष्ण तापमान सीकेडीयूसाठी पोषक ठरत आहे. यास हीट स्ट्रेस नेफ्रोपॅथी असेही म्हटले जाते. एमजीएम रुग्णालयाने २०१४-१५ मध्ये किडनीचा आजार असणाऱ्या ५६० रुग्णांचा अभ्यास केला. यात ४०% रुग्णांना सीकेडीयू असल्याचे निदान झाले.
त्यांचे वय २१ ते ४० दरम्यान होते. बहुतांश रुग्ण चौथ्या-पाचव्या स्टेजवर दाखल झाले. त्यांच्या किडनीचा आकार संकुचित झाला होता. यात ९०% शेतकरी, शेतमजूर, ४५% निरक्षर, ३९% तंबाखू, १५% मद्यसेवन करणारे, तर बहुतांश विहीर किंवा बोअरचे पाणी पीत होते.
औरंगाबाद 101 (40%) जालना 34 (60%) बीड 15 (25%) परभणी 15 (45%) नांदेड 12 (36%)
दूषित पाणी-रसायने कारणीभूत, थेट डायलिसिस करण्याची वेळ
सीकेडीयू आजाराचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी कडक उन्हात दिवसाकाठी ८-१० तास काम करणाऱ्या शेतमजुरांची संख्या अधिक आहे. प्रामुख्यानेे ३०-४० वयोगटातील पुरुष आहेत.
1. निदान : क्रिएटनिनचे प्रमाण ८ पट अधिक
खास लक्षणे नसल्याने लवकर निदान होत नाही. रुग्ण थकवा, रक्ताक्षयाची तक्रार घेऊन येतात. लघवीत प्रोटीन व युरिक अॅसिड आढळते. क्रिएटनिनचे सामान्य प्रमाण ०.७ ते १.३ मिलिग्रॅम प्रतिडेसीलिटर असते. सीकेडीयूच्या रुग्णात ते ८-१० असते. यामुळे डायलिसिस करावे लागते.
2. कारणे : पाणी कमी पिणे, रासायनिक खते
यातील रुग्ण पाणी कमी पितात, गोड पेय घेतात. जास्त मद्यसेवन करतात. रासायनिक खते-कीटकनाशकांतील शिसे, कॅडमियम, आर्सेनिक, फ्लोराइड हे जड धातू भूजल दूषित करतात. पिण्याच्या पाण्यासोबत शरीरात जातात. ग्लायफॉस्फेट व सिलिकाही धोकादायक आहे.
3. बचाव : स्वच्छ पाणी
धोका टाळण्यासाठी कामाचे मर्यादित तास, दर तासाला स्वच्छ पाणी पिणे, २ तासांत विश्रांती घेऊन सावलीत बसणे फायद्याचे ठरू शकते.
रुग्णसंख्येत वाढ : ५६० रुग्णांचा अभ्यास
गेल्या ५ वर्षांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. २०१९ मध्ये वर्षाकाठी १०० च्या पुढे रुग्ण येत आहेत. याव्यतिरिक्त नोंद नसणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
आंध्रात विधवांचे गाव : ९०% पुरुषांना किडनी आजार, शेकडो बळी
श्रीलंका, निकारागुवा, इजिप्तच्या अल-मिनिया प्रांतात उन्हात काम करणाऱ्या कामगारांना हा रोग झाल्याचे निदान झाले. जागतिक आरोग्य संघटनेने या भागांना सीकेडीयूसाठी हाय रिस्क झोन जाहीर केले आहे. तामिळनाडूतील उड्डानम व आंध्रच्या श्रीकाकुलम गावांना नॅफ्रोपॅथी व्हिलेज म्हणून जाहीर करण्यात आले. या गावांतील ९०% पुरुषांना किडनीचे आजार असून त्यांचा मृत्यूही झाला आहे. या गावांना विधवांचे गाव म्हणूनही ओळखले जाते.
सीकेडीयूची संख्या मोठी
हवामान बदलाचे परिणाम म्हणून सीकेडीयूकडे बघता येईल. अतिउष्ण भागात सर्वाधिक रुग्ण आहेत. लक्षण स्पष्ट नसल्याने रुग्ण खूप उशिरा दाखल होतात. अनेक केसेस रिपोर्टही होत नाहीत. मराठवाड्यासह राज्यातील अन्य भागातही रुग्णांची संख्या वाढत असून यावर अजून संशोधनाची गरज आहे.'
-प्रा.डॉ.सुधीर कुलकर्णी, नॅफ्रोलॉजी विभागप्रमुख, एमजीएम मेेडिकल कॉलेज अँड हाॅस्पिटल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.