आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:औरंगाबादच्या घाटीतील किडनी अन् लिव्हर चाचणी बंद, रुग्णांना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेच्या माराव्या लागतात फेऱ्या, 600 रुपयांचा भुर्दंड

संतोष देशमुख । औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दररोज शेकडो रुग्णांना खासगी प्रयोगशाळेतून करावी लागते चाचणी, वेळेचा अपव्यय, रुग्णांची हेळसांड

घाटी रुग्णालयातील किडनी (केफटी) दीड वर्ष आणि (एलफटी) लिव्हर आजार चाचणी तीन महिन्यांपासून बंद पडलेली आहे. रुग्णांना बाहेरून चाचणी करून आणण्यास सांगण्यात येते. त्यामुळे दररोज शेकडो रुग्णांना खासगी प्रयोग शाळेचा दरवाजा ठोठावा लागतोय. तपासणीसाठी वेळ लागत असल्याने पुढील उपचार, शस्त्रक्रिया लांबणीवर पडतात. बाह्य रुग्णांचा मुक्काम वाढतोय. म्हणजेच वेळेचा अपव्यय होतोय. शिवाय चाचणीसाठी ५०० आणि ऑटोरिक्षा खर्च ये जा १०० रुपये असे एकुण ६०० रुपये प्रती रुग्णांना लागत आहेत. यात रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.

घाटी रुग्णालयात केफटी व एलफटी चाचणी होत नाही यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. सोमवारी(२८ डिसेंबर) दैनिक दिव्य मराठी प्रतिनिधीने एका रुग्णांसोबत जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता, शस्त्रक्रियेसाठी, विविध आजारावर उपचार घेण्यासाठी आलेल्या बहुतांश रुग्णांना भूलतज्ज्ञ विभागामार्फत केफटी व एलफटी चाचणी बाहेरून करून आणण्यास सांगण्यात आले. तशी चिठ्ठीच लिहून देण्यात आली व वरतून १२७ मध्ये जावून बघावे. आमच्या माहितीनुसार येथे या दोन्ही चाचण्या होत नाहीत. त्यामुळे आपण बाहेरून त्या करून आणावे. यासाठी फारसे पैसे लागत नाहीत. २०० रुपयापर्यंत खर्च येईल, असा सल्लाही डॉक्टरने दिला. त्यानुसार १२७ येथील खिडकीत केफटी व केफटी करण्यासाठी गेलो असता, तेथील कर्मचाऱ्यांनी हे दोन्ही चाचण्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याचे सांगितले व बाहेरून करून आणण्याचा सल्ला दिला. तर बाहेरील खासगी लॅबकडून ५०० रुपये घेण्यात आले. ऑटोरिक्षासाठी ये जा करण्यास १०० रुपये भाडे लागले. चाचणीसाठी दोन ते तीन तास वेळ लागतो. तोवर घाटी बंद होते. म्हणजेच पूर्ण दिवस रुग्णांचा वाया गेला. वरतून आर्थिक ग्राउंड त्यांना सहन करावा लागला आहे. अशाच प्रकारे दररोज औरंगाबाद शहर जिल्ह्याबरोबर संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश, नगर येथील येणाऱ्या शेकडो रुग्णांना हा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चाचणी अतिशय महत्त्वाच्या

लिव्हर हा शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. प्रौढ पुरुषांमध्ये त्याचे वजन दीड किलोपर्यंत असते. पोर्टल व्हेन नावाची रक्तवाहिनी छोट्या आतडे आणि मोठी आतडे पांथरी यांच्याकडून रक्त गोळा करून लिव्हरला रक्तपुरवठा करते. हे रक्त लिव्हरमध्ये अन्नघटक शोषल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया होऊन हृदयाकडे पाठवले जाते. हे सर्व कार्य लिव्हर मधील वेगवेगळ्या पेशी काम करतात. या पेशी कमी होत जातात. अशाच प्रकारे दोन्ही किडन्या शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवांपैेकी एक आहे. किडनीच्या आजारांविषयी सामान्यांना फारशी माहिती नसते. किडनी अॅटक सुद्धा येतात. हातापायाला सुज येणे, पोट फुगणे यासह विविध लक्षणे दिसू लागले व शरीराला व्याधी झाले की, साधं नाक, कानाचे ऑपरेशन करायचे म्हटले तरी या चाचण्या कराव्या लागतात. भुल तज्ज्ञांना गरज वाटेल त्या रुग्णास या चाचण्या करून घेण्यास सांगितले जाते. त्या शिवाय पुढील उपचारच होत नाहीत.

प्रा. डॉ. कानन येळीकर अनभिज्ञ

केफटी व एलफटी चाचणी बंद का आहेत? याबाबत शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. कानन येळीकर यांना विचारणा केली असता, मला सांगता येणार नाही. तुमच्याकडून मला हे कळतंय. संबंधित विभागाच्या शिंदे यांना विचारणा करून तुम्हाला पाच ते दहा मिनिटात फोनवर माहिती देते असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, ते पाळले नाही. सायंकाळी फोन करून पुन्हा विचारले असता किट संपल्यामुळे चाचणी बंद असल्याचे सांगितले. तसेच तातडीने दोन्ही चाचण्या सुरू करण्याचे निर्देश दिल्याचेही स्पष्ट केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser