आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघाटी परिसरातील पाणचक्की रस्त्यावर राहणाऱ्या दाेन भिकाऱ्यांचा गळा आवळून व डाेक्यात दगड टाकून रविवारी मध्यरात्री एका नशेखाेराने खून केला. सकाळी ते दाेघे जिवंत आहेत का हे पाहण्यासाठी आलेला आराेपी वजीर बशीर शेख (३२, रा. कोहिनूर कॉलनी) हा अलगद पाेलिसांच्या जाळ्यात अडकला. पाेलिसांनी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली. नागेश्वर शिवलिंग घुसे (५०, रा. कोहिनूर कॉलनी) व संघराम रंकट (७०) अशी मृतांची नावे आहेत.
मृत नागेश्वरचे घर कोहिनूर कॉलनीत आहे. त्याला दारूचे व्यसन असल्याने तोे घाटीतील मुलींच्या वसतिगृहाच्या कंपाउंड वॉलजवळ झोपडी बांधून राहत होता. ताे घाटीत ग्रामीण भागातून येणारे गरीब रुग्ण व रुग्णवाहिका चालकांना मदत करत असे. रविवारी सकाळीच घरी जाऊन आला होता. सायंकाळी त्याच्या माेठ्या भावाने बहीण भेटायला आल्याने घरी चलण्याचा आग्रह केला. मात्र, तो गेला नाही. त्याच रात्री नागेश्वर, वजीर व अन्य तिघे दारू व गांजा पिण्यासाठी पाणचक्की परिसरात बसत होते.
तेव्हा त्यांच्यात किरकोळ वाद झाला. वजीरने नागेश्वरचा नारळाच्या दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संघरामने विरोध केल्याने वजीरने त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकचा गट्टू मारला. नंतर दोघांचा गळा आवळून खून केला. सकाळी उठल्यानंतर रात्री मारहाणीत नेमके काय झाले हे पाहण्यासाठी तो घटनास्थळी गेला. पोलिसांनी शेजारील झोपड्यामध्ये राहणाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा रात्री वजीर व नागेश्वरचे भांडण झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह घाटीत हलवले. संघराम कोठून आला होता याचा तपास पोलिस करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.