आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबडतर्फ पाेलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. या गृहमंत्र्यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अाता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी साेमवारी अाैरंगाबादेतील पत्रकार परिषदेत केली. गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्याने वाझेच्या वसुलीचे प्रकरण संपणार नाही, तर शिवसेेनेचे राज्यमंत्री अनिल परब यांच्यासह अजून तीन मंत्र्यांचा संबंधही लवकरच स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मंत्र्यांची नावे मात्र त्यांनी सांगितली नाही. साेमय्या म्हणाले, ‘टीआरपी घोटाळा, मनी लाँडरिंग, बिटकॉइन, पोलिसांच्या बदल्यांसह अनेक प्रकरणांत २० हजार कोटींवर आर्थिक गैरव्यवहार झाला अाहे. गृहखात्यात केवळ अनिल देशमुख सगळे पैसे ठेवत होते का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इतरही कोणी लाभार्थी होते का, याचीही चौकशी करण्याची गरज अाहे. एनआयएच्या तपासात विविध एजन्सी सहभागी होतील तेव्हा अनेक मंत्र्यांचा घोटाळ्यातील सहभाग स्पष्ट होईल,’ असा दावाही त्यांनी केला.
सचिन वाझे याची २० जून २०२० नंतर नियुक्तीची फाइल क्राइम ब्रँचमार्गे ‘आयसीयू’त गेली म्हणजेच गायब झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. ठाकरे सरकारचा वसुलीचा धंदा पूर्ण बाहेर आल्यानंतर अजून धक्कादायक माहिती बाहेर येईल, असेही त्यांनी सांगितले. उच्च न्यायालयाचे आदेश डावलून ठाकरे सरकारने वाझेंची नियुक्ती केल्याने त्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप सोमय्यांनी केला. या पत्रकार परिषदेला खासदार डाॅ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, अाेबीसी मोर्चाचे राज्य सचिव बापू घडमोडे, अनिल मकरिये, समीर राजूृरकर, प्रशांत देसरडा आदींची उपस्थिती होती. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यावर आता सत्ताधारी शिवसेनेकडून काय उत्तर येते याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारने सैन्याची मदत घ्यावी
राज्य सरकारने कोविडवर मात करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. सैन्याची मदत घेऊन युद्धपातळीवर काम करावे, असे अावाहनही साेमय्या यांनी केले. औरंगाबादेत पाचशे व्हेंटिलेटरची मागणी असताना केवळ १४२ मिळाले. यातील ११० सुरू असून ३२ बंद आहेत. ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधी राज्याने व्हाइट पेपर जारी करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.