आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:वेरूळ लेणीजवळील कीर्तीस्तंभ हटवला जाणार नाही : केंद्रीय संस्कृती मंत्री जी.किशन रेड्डी यांचे आश्वासन

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरुळ येथील कीर्ती स्तूप संबंधी निवेदन किशन रेड्डी यांना देताना ललित गांधी

औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ लेणीच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारासमोर जैन कीर्तीस्तंभ हटवण्यात येणार नाही असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.

याबाबत 'दिव्य मराठी'ने वृत्त प्रकाशित केले होते

वेरूळ येथे बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माच्या लेणी असताना केवळ एकाच धर्माचे प्रतीक असणारा स्तंभ चुकीचा वाटतो. यामुळे तो स्थलांतरित करून त्या जागी “वर्ल्ड हेरिटेज स्टोन’ हा नामफलक बसवण्यात येणार आल्याचे भारतीय पुरातत्त्व खात्याने सांगितले होते.

वेरूळ लेण्याजवळील कीर्ती स्तंभ हटवण्याचे पत्र पुरातत्त्व विभागातर्फे जैन समाजाला पाठवण्यात आल्याचे समजल्यानंतर देशभरातील जैन समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. यासंबंधी 'अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे' राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री ना. जी. किशन रेड्डी यांची हैदराबाद येथे भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर जी.किशन रेड्डी यांनी जैन समाजाच्या भावना दुखावतील असा कोणताही निर्णय पुरातत्व विभागातर्फे केला जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही देऊन यासंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांचा सत्कार करताना केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी.
जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांचा सत्कार करताना केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी.

जैन समाजाचे राष्ट्र निर्माण कार्यातील असलेले योगदान, भगवान महावीर यांचा विश्व शांतीचा संदेश देशातील सर्वांसाठीच सन्माननीय आहेत, त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे कार्य होणार नाही. अशी ग्वाही दिली. या संबंधी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी एक व्हिडीओ संदेश ही यावेळी प्रसारीत केला.

जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी कीर्ती स्तंभाची उभारणी व त्याच्या देखभाली संबंधातील माहिती देऊन याविषयीच्या समाजाच्या भावना व्यक्त केल्या. याचबरोबर जैन समाजाच्या देशभरातील विविध ठिकाणी असलेल्या प्राचीन तीर्थक्षेत्र संबंधी पुरातत्त्व विभागाकडून येत असलेल्या अडचणी, अनेक प्राचीन मंदिरांचा प्रलंबित असलेला जीर्णोद्धार, विविध ठिकाणी उत्खननात आढळणार्‍या जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा व मंदिरांचे अवशेष याचे हस्तांतरण यासंबंधी येणाऱ्या अडचणी, या बाबीवर संस्कृती मंत्र्यांशी ललित गांधी यांनी सविस्तर चर्चा केली.

प्राचीन मंदिरांचे जीर्णोद्धार, प्राचीन तीर्थक्षेत्र यांच्या जीर्णोद्धार संबंधित विषय, सम्मेद शिखरजी, गिरणार, शत्रुंजय आदी तीर्थांचे पावित्र्य जपण्याच्या विविध मागण्या, यासंबंधी पुरातत्त्व विभाग, संस्कृती खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांची जैन समाजाच्या शिष्टमंडळासमवेत केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच संयुक्त बैठक आयोजित केली जाईल असे स्पष्ट आश्वासनही श्री रेड्डी यांनी दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, महासंघाच्या आंध्र प्रदेश विभागाचे अध्यक्ष मुकेश चौहान, तेलंगणा विभागाचे अध्यक्ष विमल नहार, दिगंबर समाजाचे पदाधिकारी अशोक पहाडे, मिथुन पोरवाल आदी मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेतला. या वेळी केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांचा विशेष सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...