आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापूर:‘त्या’ दिवशी कोल्हापुरात 10, तर साताऱ्यात सातपट जास्त पाऊस, हवामान बदलामुळे 22-23 जुलैचा हाहाकार

औरंगाबाद / अजय कुलकर्णी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात अचानक आलेल्या महापुराने, दरडी कोसळल्याने शेकडो बळी घेतले. गुरुवार, २२ जुलै ते २४ जुलै या काळात या परिसरात ‘न भूतो..’ स्वरूपाचा धुवाधार पाऊस झाला. त्या काळात कोल्हापुरात २४ तासांत अपेक्षित पावसाच्या १० पट जास्त पाऊस झाला, तर साताऱ्यात सातपट तसेच मुंबईच्या उपनगरात आठपट जास्त पाऊस कोसळला. रत्नागिरीत जुलैमधील पावसाने ४० वर्षांचा रेकॉर्ड तोडत नवा विक्रम नोंदवला. रायगड जिल्ह्यात २२ जुलै ते २६ जुलै या काळात १८८ मिमी पाऊस अपेक्षित असताना ३७८ मिमी पाऊस झाला. कमी वेळात अत्यंत वेगाने झालेल्या या पावसामुळे ठिकठिकाणी सह्याद्रीचे कडे कोसळले, पाणी नद्यांचे पात्र सोडून शहरांत-गावागावात घुसले. राज्यातही एक जून ते २६ जुलै या काळात अपेक्षित पावसाच्या ३३ टक्के जास्त पाऊस झाला आहे.

राज्यातील पाच जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत अति जास्त पाऊस, तर २१ जिल्ह्यांत जास्त पाऊस झाला आहे. हवामानातील बदल हा घटक यामागे असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी वर्तवले आहे. कोकण, सातारा, सांगली, कोल्हापुरात महापूर आला त्या दिवशी कोकण किनाऱ्यानजीक अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचा पट्टा होता. गुजरातच्या किनाऱ्यापासून ते केरळच्या किनाऱ्यापर्यंत हा पट्टा होता आणि तो मान्सूनच्या आसप्रमाणे कार्यरत होता. त्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. या पावसानेच घात केला.

हवामान बदलाची आणीबाणी
हवामान बदलाचे परिणाम जगभर सर्वत्र दिसत आहेत. युरोपात महापुराने थैमान घातले आहे. चीनमधील सात राज्यांत पाणीच पाणी झाले आहे. कमी काळात अत्यंत वेगाने पाऊस होणे हे या बदलाचे द्याेतक आहे. कोकण- सातारा-कोल्हापूरमध्ये आलेला महापूर हवामान बदलामुळेच आला आहे. - डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ.

कृष्णेचा महापूर नैसर्गिकच : अजित पवार
सांगली | कृष्णा नदीला आलेला महापूर हा केवळ निसर्गनिर्मित आहे, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. परंतु ४८ तास कोयना खोऱ्यात पावसाने पूर्ण विश्रांती घेतली तरी महापुराचा विळखा जैसे थे कसा, या प्रश्नावर ते मात्र निरुत्तरच झाले. राष्ट्रीय जल आयोगाने दिलेल्या सूचनेचे पालन पाटबंधारे विभागाने केले आहे काय, याबाबत तज्ज्ञांशी सल्लामसलत करून योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

नेमके काय घडले : अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस २२ व २३ जुलै : महाबळेश्वरात ४८ तासांत १०७५ मिमी पाऊस. २३ जुलै : कोल्हापुरात २४ तासांत २३२.८ मिमी म्हणजे १० पट जास्त पाऊस झाला. २३ जुलै : सातारा जिल्ह्यात २४ तासांत अपेक्षितच्या तुलनेत सातपट जास्त पाऊस झाला. २२ ते २४ जुलै : राज्यातील सरासरी पावसाचे प्रमाण २३ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांवर गेले. २२ ते २६ जुलै : रायगड जिल्ह्यात अपेक्षित पाऊस १८८ मिमी, पडला ३७८ मिमी. १ ते २६ जुलै : रत्नागिरीत जुलैत ४० वर्षांतील विक्रमी पाऊस. येथे जुलैची सरासरी ९७५.५ मिमी आहे. एक जूनपासून आजपर्यंत २५९० मिमी पाऊस झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...