आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य:'शिवाजी महाराज जुन्या काळातले; आता आंबेडकर, गडकरी, पवार हेच आदर्श'

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजी महाराज जुन्या काळातले विषय आहेत. तुमचे हिरो तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श आहेत, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डॉक्टरेटने गौरवण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी बोलत होते.

काय म्हणाले कोश्यारी?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो. तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण. त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र, कोणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील. शिवाजी महाराज जुन्या काळातला विषय. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले.

हेच आमचे आयडॉल

कोश्यारी म्हणाले की, मागच्याच वर्षी या दोघांनाही माझ्या हस्ते मानद पदवी देण्यात आली. आता पुन्हा या दोघांना माझ्या हस्ते डिलीट दिली गेली. आणखी दोन ते तीन विद्यापीठांची डिलीट यांना देणे बाकी आहे. तेथील कुलगुरूंना मी म्हणतो तुम्हाला दुसरे कोणी सापडत नाहीत का.? तर ते म्हणतात हेच आमचे आयडॉल आहेत. यांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांनाच डिलीट द्यायची आहे. म्हणून माझाही नाईलाज होतो.

शिवाजी पुराने युग की बात...

आमच्या शाळेत तुमचे आदर्श कोण असे विचारले जायचे. त्यावेळी कुणी सुभाषचंद्र बोस तर कोणी नेहरू, तर कोणी गांधी सांगायचे. आता नव्या युगाचे मी सांगतो आहे. तुम्हाला दुसरीकडे शोधायची गरज नाही. याच महाराष्ट्रात तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच आदर्श आहेत. असे म्हणत त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी यांची तुलनाही केली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कोणी तुमचे आदर्श विचारले तर तुम्ही नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे नाव घ्या. तेच नव्या युगाचे शिवाजी महाराज आहेत. शिवाजी तो अब पुराने युग की बात हो गयी है..!, असेही त्यांनी म्हटले.

पवार, गडकरी व्हिजनरी...

कोश्यारी पुढे म्हणाले की, नितीन गडकरी आणि शरद पवार हे दोघेही व्हिजनरी नेते आहेत. नितीन गडकरी तर व्हिजनरी आणि मिशनरी दोन्ही आहेत. आजकालच्या युगात मिशनरी असणाऱ्यांची संख्या कमी आहे. गडकरी व्हिजनरी आणि मिशनरी आहेत, त्यांचा आदर्श घा.

यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात कोश्यारी यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी कोश्यारींच्या विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरही त्यांनी आक्षेपार्ह विधान केले होते.

घाणेरडा विचार येतोच कसा?

युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, राज्यपाल असे का बोलतात मला समजत नाही. त्यांना महाराष्ट्राबाहेर पाठवून द्या, अशी विनंती मी हात जोडून पंतप्रधानांना करतो. अशी व्यक्ती आम्हाला नकोय. जी महाराष्ट्राचे वैभव धुळीस मिळवतात. असा घाणेरडा विचार घेऊन ते येऊच कसे शकतात..

त्यांना पवार, गडकरी आज कळले

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल देसाई यावर म्हणाले की, राज्यपाल महामहीम कोश्यारी यांची विधाने अशाच प्रकारची असतात. त्यांना पवार साहेब आणि गडकरी साहेब आज कळले असतील म्हणून त्यांनी हे विधान केले असेल.

बातम्या आणखी आहेत...