आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासकीय गोंधळ:क्रांती चौक उड्डाणपुलावर ताबा कुणाचा? मंत्र्यांसमोरही यंत्रणांचे एकमेकांकडे बोट; एमएसआरडीसी, मनपा, सा. बां. विभागांत समन्वयाचा अभाव

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बहुचर्चित क्रांती चौक उड्डाणपूल नेमका कोणत्या खात्याच्या ताब्यात आहे, याचा कुणालाच ताळमेळ नाही. याचा अनुभव गुरुवारी खुद्द केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही घेतला. हा पूल नेमका कुणाच्या ताब्यात आहे, असे डॉ. कराड यांनी विचारताच महापालिका, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एकमेकांकडे बोट दाखवले. डॉ. कराड यांनी पुन्हा-पुन्हा विचारल्यानंतरही या पुलाचा ताबा नेमका कुणाकडे आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. प्रशासकीय गोंधळाचा हा उत्कृष्ट नमुना औरंगाबादकरांना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ अर्थात एमएसआरडीसीने औरंगाबाद शहरात एकात्मिक रस्ते विकास योजनेतून २०११ ते २०१६ या काळात एकूण पाच उड्डाणपुलांचे बांधकाम केले. प्रत्येक पुलासाठी दोष निवारण कालावधी (डीएलपी) हा पाच-पाच वर्षांचा होता. हा कालावधी संपल्यानंतर एमएसआरडीसीने हे पूल संबंधित यंत्रणांकडे हस्तांतरित करणे अपेक्षित होते. हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्णपणे अर्धवट अवस्थेत असल्याचा आरोप महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला.

कोणत्या विभागाचे अधिकारी काय म्हणाले?
क्रांती चौक उड्डाणपूल २०१८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित केल्याचे एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले. त्यावर सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता पी. आर. सोनवणे यांनी साळुंके म्हणाल्या, एमएसआरडीसीसारखाच आमचाही विभाग केवळ केंद्र सरकारच्या निधीतून रस्ते, पूल तयार करण्याचे काम करतो. काम झाल्यावर संबंधित यंत्रणेकडे हस्तांतरण करून आम्ही मोकळे होतो. असे असताना हा पूल आमच्याकडे कसा येईल, असा प्रश्न करत हा पूल नियमानुसार महापालिकेच्या ताब्यात जायला हवा, असे त्या म्हणाल्या. त्यावर मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी जालना रोडच आमच्या ताब्यात नाही, उड्डाणपूल कसा येईल, असा युक्तिवाद केला. जर हे पूल महापालिकेकडे हस्तांतरित करायचे असतील तर त्याची रीतसर प्रक्रिया पार पाडली पाहिजे. या पुलांवर खड्डे आहेत, त्यांची दुरुस्ती करूनच त्याचे कागदोपत्री हस्तांतरण झाले पाहिजे. तोंडी बोलण्याला काही अर्थ नसल्याचे पानझडे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सर्वजण म्हणाले, हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच ताब्यात दिला पाहिजे. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर म्हणाले, आमच्याकडील मनुष्यबळ आणि इतर बाबी पाहता हा पूल सांभाळणे आम्हाला शक्य नाही. बराच वेळ खल झाला तरी या पुलाची जबाबदारी कुणाची आणि भविष्यात कुणाकडे असेल, यावर एकमत झाले नाही.

अखंड उड्डाणपुलाचे काय?
चिकलठाणा ते वाळूज अशा अखंड उड्डाणपुलाच्या चर्चा मागील चार महिन्यांपासून सुरू आहेत. मात्र, हा पूल अजूनही हवेतच आहे. केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या आडून औरंगाबादकरांना अखंड उड्डाणपुलाचे स्वप्न दाखवले खरे; मात्र, चार महिन्यांमध्ये या पुलाच्या चर्चेत काहीच प्रगती नाही. याबाबत कराड म्हणाले, या पुलासाठी भूसंपादनासह तीन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचे प्राथमिक डिझाइन तयार केले असून शहरात सहा ठिकाणी चढणे आणि उतरण्याची ठिकाणे त्यावर असतील. लवकरच या पुलाच्या डीपीआरचे काम सुरू होईल, अशी आशा डॉ. कराड यांनी व्यक्त केली.

उड्डाणपूल सुरक्षित, ‘तो’ जोड भरून काढणार
क्रांती चौक उड्डाणपुलाला भगदाड पडल्याच्या अफवांनंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गुरुवार, ६ जानेवारी रोजी महापालिका, एमएसआरडीसी, एनएचएआय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना सोबत घेऊन पाहणी केली. तेव्हा या उड्डाणपुलाला भगदाड पडलेले नसून तो जोड आहे. फक्त या जोडावरील रबर आणि स्टीलचे अँगल निघून पडल्याने त्यातील डांबराचा थर गळून गेल्याचे समोर आले. या जोडाची दुरुस्ती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या वतीने केली जाणार आहे.

डॉ. कराड यांनी दुपारी एक वाजता महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता बी. पी. साळुंके, एनएचएआयचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, व्यवस्थापक महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता पी. आर. सोनवणे यांच्यासोबत पाहणी केली.

क्रांती चौक उड्डाणपुलाच्या जोडवरील डांबर गळून पडल्याने जवळपास ८० एमएम रुंदीची फट आरपार दिसत होती. या फटीचे फोटो सोशल मीडिवर व्हायरल झाल्याने औरंगाबादकर घाबरून गेले होते. विशेष म्हणजे ‘क्रांतीचौक उड्डाणपूल फुटला असून कुणीही या पुलावरून जाऊ नये’, असे भीती पसरवणारे आवाहनदेखील सोशल मीडियावरून करण्यात आले होते. त्यानंतर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या पुलासह सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश एमएसआरडीसीला दिले होते.

गुरुवारी डॉ. कराड यांनी या पुलाची पाहणी केली. या वेळी ज्या जॉइंटमधून खालची बाजू आरपार दिसत होती, त्या जॉइंटजवळ थांबून अधिकाऱ्यांनी मोजमाप केले. तेव्हा तो जॉइंट तब्बल ८० एमएम रुंदीचा असल्याचे आढळून आले. नियमानुसार उड्डाणपुलावर २५ ते ४० एमएम रुंदीचा जाॅइंट असावा लागतो. मात्र, या जॉइंटची रुंदी दुप्पट आढळून आली. ही रुंदी उड्डाणपूल बांधला तेव्हापासूनची असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, हा टेक्निकल जॉइंट असून त्याला भगदाड किंवा पूल फाटला, असे म्हणता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

एमएसआरडीसी करणार उड्डाणपुलाची दुरुस्ती
हा पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेला असून २०१७ मध्ये त्याचा दोषनिवारण कालावधी संपलेला आहे. त्यामुळे आता एमएसआरडीसी स्वत: या पुलावरील जॉइंट भरून देणार आहे. जॉइंट भरण्यासाठी रबर आणि स्टीलचे अँगल टाकून त्यावरून डांबराचा एक थर टाकला जाणार असल्याचे एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...