आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सेरेब्रल पाल्सीवर मात करत कृष्णा करतेय नीटची तयारी, मुलीला स्वत:च्या पायावर उभे करणाऱ्या आईचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवव्या महिन्यात जेव्हा सेरेब्रल पाल्सीचे निदान झाले तेव्हा पायाखालची जमीन सरकली. १३ व्या महिन्यापासून हैदराबादेत उपचारांना सुरुवात केली. मात्र, सर्वसामान्य मुलांप्रमाणे तिला उभे करायचे असेल तर विशेष परिश्रम, प्रशिक्षण गरजेचे होते. त्यामुळे औरंगाबादेत आले. आज ती नीट परीक्षेची तयारी करते आहे. तिला उभे करण्यासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले, अशा भावना मुंबईच्या कला साधना संस्थेचा नवदुर्गा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मीरा बंग यांनी व्यक्त केल्या. मीरा म्हणाल्या, इतर बाळांप्रमाणे कृष्णाच्या हालचाली नव्हत्या. त्यामुळे नवव्या महिन्यात काही चाचण्या केल्या. तेव्हा डायपेल्जिक सेरेब्रल पाल्सीचे निदान झाले. यामध्ये शरीराच्या दोन्ही बाजू कमकुवत असतात. यामुळे बोलण्याला अडथळा येतो. हाताच्या क्रिया सुरळीत नव्हत्या. मानसिक कमकुवतपणाही होता. या सर्वांची आणि यापुढच्या प्रवासाची जाणीव डॉ. ए. के. पुरोहित यांनी करून दिली. पण, कृष्णाला उभे करायचेच हा निश्चय करून १३ व्या महिन्यापासून उपचाराला सुरुवात केली. उपचारांसाठी हैदराबादहून मुंबईला गेलो. दरम्यानच्या काळात औरंगाबादेतील विशेष मुलांसाठीच्या विविध केंद्रांची माहिती मिळाली. यामध्ये स्पीच थेरपी, फिजिओ थेरपीचे उपचार सुरू केले. या आजारात डॉक्टर आणि प्रशिक्षक बदलून चालत नाही. तर आईला विशेष परिश्रम घ्यावे लागतात. आमचे एकत्र कुटुंब आहे. पण, कृष्णाला बरे करायचे असल्याने औरंगाबादेत राहू लागले. इथे विविध प्रकारच्या थेरपी सुरु केल्या.

स्विमिंग, बॅडमिंटन, डान्स, सायकलिंगमध्ये निपुण
अशी मुलं एकाच गोष्टीत प्रावीण्य मिळवू शकतात. पण, कृष्णा स्विमिंग, बॅडमिंटन, डान्स, सायकलिंग या सर्व गोष्टींत निपुण आहे. एवढेच नव्हे तर मारवाडी, मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत या पाच भाषांवरही तिचे प्रभुत्व आहे. याकरिता तिचे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदले गेले आहे. आपल्याला झालेला त्रास कुणाला होऊ नये, म्हणून मीरा इतरांनाही मार्गदर्शन करतात. त्यामुळेच राष्ट्रस्तरीय नवदुर्गा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...