आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केटीकॉन परिषद औरंगाबादमध्ये:देशातील अडीचशे युरोलॉजिस्ट होणार सहभागी; 25 नोव्हेंबरपासून आयोजन

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युरॉलॉजी सोसायटी ऑफ इंडिया, वेस्ट झोन युरॉलॉजी सोसायटी ऑफ इंडिया आणि औरंगाबाद युरॉलॉजी संघटनेच्यावतीने मूत्रपिंड प्रत्यारोपणावरील देशस्तरीय तीन दिवसीय केटीकॉन २०२२ ही कार्यशाळा औरंगाबादेत होत आहे.

बघा, शिका आणि शिकवा हे त्रिसूत्र घेऊन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस लाइव्ह ऑपरेशन आणि त्यावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन मूत्रशल्य चिकित्सकांना मिळेल अशी माहिती संयोजन समितीचे सरचिटणीस तथा युरॉलॉजी सोसायटी ऑफ इंडियाच्या किडनी ट्रान्सप्लांट विभागाचे संयोजक डॉ. अजय ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

थेट प्रक्षेपण

हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान ही कार्यशाळा होत असून, त्यात अडीशचे मूत्रशल्यचिकित्सक सहभागी होणार आहेत. २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. तीन दिवसीय कार्यशाळेत देश - विदेशातून आलेले तज्ज्ञ प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करणार असून त्याचे थेट प्रक्षेपण कार्यशाळेत सहभागी मूत्रशल्यचिकित्सकांना बघता येणार आहे. या सर्व शस्त्रक्रिया सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये होणार आहेत आणि त्याचे थेट प्रक्षेपण हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या हॉलमध्ये आहे, अशी माहिती डॉ. पळणीटकर यांनी दिली.

मोफत शस्त्रक्रिया

महाराष्ट्र शासन किडनी ट्रान्सप्लांट अप्रॉप्रिएट अथॉरिटीने शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली असून सुमारे चार ते पाच गरजू रुग्णांवर या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याचे डॉ. अजय ओसवाल यांनी सांगितले. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि भारतातून कार्यशाळेसाठी प्रतिनिधी येणार आहेत.

दिग्गज सहभागी

यूरालॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सबनीस, लखनौचे डॉ. अनिश श्रीवास्तव, कॅडवरिक डोनर ट्रान्सप्लान्टमध्ये ज्यांचे मोठे काम आहे, असे चेन्नईचे डॉ. सुनील श्रॉफ, अहमदाबादचे डॉ. जमाल रिझवी, नाडीयादचे डॉ. अरविंद गणपुले, मुंबईचे डॉ. फिरोज सुनावाला, इंदोरचे डॉ. चंद्रशेखर थत्ते औरंगाबादचे डॉ. अजय ओसवाल प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून दाखवणार आहेत. लाइव्ह शस्त्रक्रियांबरोबरच निवासी डॉक्टरांसाठी पोस्टर प्रदर्शन, शोधनिबंध वाचन, प्रश्न मंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

गैरसमज दूर व्हावेत

अमेरिकेनंतर भारतात सर्वात जास्त मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात. शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे मूत्रपिंड दानाचे प्रमाण वाढत असले तरी अद्यापही हजारोंनी रुग्ण किडनी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मूत्रपिंड दानाच्या संदर्भातील गैरसमज दूर व्हावेत, ब्रेनडेड रुग्णांच्या अवयव दानाविषयी जागृती व्हावी आणि शस्त्रक्रियांसंदर्भातील शल्यचिकीत्सकांचे ज्ञान वाढावे हाही या कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश असल्याचे डॉ. अजय ओसवाल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...