आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:ला निना आला; सौम्य हिवाळ्यातही बरसणार अवकाळी पाऊस, आता रब्बीवरही गारपिटीचे सावट

औरंगाबाद / अजय कुलकर्णी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैऋत्य मोसमी पावसाने अद्याप देशातून निरोप घेतलेला नसतानाच प्रशांत महासागरात ला निना स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे यंदाचा हिवाळा सौम्य राहील, तसेच दर महिन्याला एक-दोन अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. राज्यातील बहुतांश भागांत सप्टेंबरमध्ये मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला, त्याचा फटका काढणीला आलेल्या खरिपाच्या पिकांना बसला. मान्सूनने राज्यातून निरोप घेतला असला तरी दक्षिण भारतात नैऋत्य मान्सून अद्याप सक्रिय आहे. त्यामुळे रब्बीचा पेरा लांबण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या नॅशनल क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरच्या अहवालानुसार मध्य विषुववृत्तीय प्रशांत महासागरात ला निना स्थिती निर्माण झाली आहे. सद्य:स्थिती पाहता डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत ला निना स्थिती राहण्याची शक्यता ८७ टक्के आहे. मार्च-एप्रिलमध्येही ला निनाला अनुकूल स्थिती राहील. परिणामी भारतात हिवाळा सौम्य राहील. नोव्हेंबर ते मार्च या काळात भारतात सातत्याने ढगाळ हवामान राहून अवकाळी पाऊस, गारपिटीस अनुकूल स्थिती राहील.

ला निनाचा परिणाम : ला निना हा स्पॅनिश शब्द असून लहान मुलगी असा त्याचा अर्थ आहे. पूर्व प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा जास्त थंड होणे म्हणजे ला निना स्थिती. ला निना स्थिती असताना विषुववृत्तीय पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा ३ ते ५ अंश सेल्सियसने कमी असते. या थंड पाण्यामुळे पूर्व प्रशांत महासागरावर जास्त दाब तयार होतो. परिणामी भारतात सातत्याने ढगाळ हवामान, गारपीट, अवकाळी पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते. अल निनोमध्ये नेमकी याच्या उलट स्थिती असते.

आगामी वर्षभर ढगाळ हवामान, पावसाचे सावट
प्रशांत महासागरात ला निना स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी भारतात आगामी काळात ढगाळ हवामान राहील. दर महिन्याला अवकाळी पाऊस, जानेवारी-फेब्रुवारीत गारपिटीची शक्यता असून हिवाळा सौम्य राहील. मार्चनंतरही ला निना स्थिती अनुकूल राहिली तर उन्हाळाही सौम्य राहील. मान्सूनपूर्व काळात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. - डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ.

बातम्या आणखी आहेत...