आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथे रॅकेट उघडकीस:सातारा परिसरातील लॅबचालक 35 हजारांत विकायचे रेमडेसिविर, दोन आरोपींना अटक; सहा इंजेक्शन्स जप्त

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • “दिव्य मराठी’च्या स्टिंग ऑपरेशननंतर यंत्रणा अलर्ट

मृत्युशय्येवर असलेल्या काेराेना रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णालयातून चोरून ते जास्त दराने इतरांना विक्री करणाऱ्या दाेन अाराेपींना साेमवारी रात्री तीन वाजता गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. गेल्या १७ दिवसांत रेमडेसिविरची काळ्याबाजारात विक्री करणारे चार वेगवेगळे रॅकेट पाेलिसांनी उघडकीस अाणले अाहेत. या रॅकेटमधील अाराेपींमध्ये महापालिकेत काम करणाऱ्या दाेघांचाही समावेश अाहे. या चाैघांनाही न्यायालयाने १० मेपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली. चारही प्रकरणांतील अाराेपींकडून आतापर्यंत जप्त करण्यात आलेले बहुतांश इंजेक्शन हे सरकारी रुग्णालयातून चाेरलेले अाहेत. या टाेळ्यांचा औरंगाबाद, परभणी, बीड, जालना या शहरांशी संबंध असल्याचेही समाेर अाले अाहे.

सोमवारी रात्री पुंडलिकनगर भागात गोकुळ स्वीट्ससमोर दोन व्यक्ती रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार रात्री तीन वाजता सापळा रचण्यात रचून संदीप अप्पासाहेब चवळी (२५, रा. सातारा परिसर) व गोपाल हिरालाल गांगवे (१९, रा. ज्योती प्राइड सातारा परिसर) यांना अटक करण्यात आली. हे दोघेही पॅथॉलॉजी लॅबचालक आहेत. त्यांच्याजवळून वेगवेगळ्या कंपनीचे सहा इंजेक्शनसह १ लाख ८७,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सापळा रचताना खबऱ्यामार्फत अाराेपींना दोन इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली. ३५ हजार प्रति इंजेक्शन दर ठरला. मात्र, अाराेपींकडे जास्त इंजेक्शन असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाेलिसांनी डमी ग्राहकामार्फत अाम्हाला आणखी दोन इंजेक्शन पाहिजे, असे अाराेपींना सांगितले. त्यामुळे अाराेपी चार इंजेक्शन घेऊन अाले हाेते. पाेलिसांनी अटक केली तेव्हा त्यांच्याकडून हे चार व त्यांच्या सातारा परिसरातील लॅबमधून दाेन इंजेक्शन जप्त करण्यात अाले.

संदीप व गाेपाळ यांच्याकडून जप्त केलेल्या इंजेक्शनवर ‘नाॅट फाॅर सेल’ असे लिहिलेले अाहे. म्हणजे ते सरकारी दवाखान्यातील असण्याची शक्यता अाहे. हे इंजेक्शन्स परभणीतून आठ हजार रुपयांना शेळके नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे हे दाेघे सांगत अाहेत. त्याबाबत अधिक तपासासाठी शहर पाेलिस परभणीत गेले. मात्र ताेपर्यंत संशयित व्यक्ती फरार झाल्याची माहिती समाेर अाली. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त मीना मकवाना, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र साळोखे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, औषध निरीक्षक जीवन जाधव, हवालदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, रितेश जाधव, विशाल पाटील, आनंद वाहूळ, राजकुमार सूर्यवंशी, शिनगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

“दिव्य मराठी’च्या स्टिंग ऑपरेशननंतर यंत्रणा अलर्ट : “दिव्य मराठी’ने २७ एप्रिल रोजी स्टिंग ऑपरेशन करून शहरातील रेमडेसिविरचा काळाबाजार कसा चालतो हे समोर आणले. त्यानंतर आठ दिवसांत पोलिसांनी मनपातून चालणारा काळाबाजार व सातारा परिसरातील लॅबचालकांचे रॅकेट उघडकीस अाणले. त्यापूर्वी १६ एप्रिल रोजी चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात काम करणारा चतुर्थश्रेणी कर्मचारी दाेन मेडिकल चालकांच्या मदतीने जेरबंद झाला हाेता. तेही सरकारी रुग्णालयातील इंजेक्शन्स चाेरून काळ्याबाजारात विकत हाेते. बीडमधील एका मेडिकलचालकाचाही या रॅकेटमध्ये सहभाग हाेता. २७ एप्रिल रोजी गुन्हे शाखेने जालना, बदनापूर व अाैरंगाबाद येथे एकाच वेळी कारवाई करून काळाबाजार करणाऱ्या सात जणांना अटक केली हाेती. परंतु या तिन्ही प्रकरणांत साखळीतील शेवटच्या आरोपीपर्यंत पोलिस अजून पाेहाेचू शकलेले नाहीत. काही प्रकरणांत तर आरोपी जामिनावरही सुटले आहेत.

मामासाठी आणले, त्यांचा मृत्यू झाल्याने विकतोय : आरोपी

पॅथॉलाॅजीचालक संदीप चवळी आणि गोपाल गांगवे यांना पोलिसांनी मंगळवारी काेर्टात हजर केले. तेव्हा “हे इंजेक्शन आम्ही मामासाठी आणले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाल्यामुळे हे विकायला काढले,’ असे अाराेपींच्या वतीने सांगण्यात अाले. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे व सरकारी वकील भागवत काकडे यांनी सरकारची बाजू मांडली. इंजेक्शन मिळत नसल्याने अनेक काेराेनाग्रस्तांचा मृत्यू हाेत अाहे. अशा परिस्थितीत हे लाेक काळाबाजार करत अाहेत. हा सामाजिक अपराध असून अशी वर्तणूक करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती असणे आवश्यक आहे, असे सरकारी पक्षातर्फे सांगण्यात अाले. त्यानंतर न्यायालयाने दाेन्ही अाराेपींना १० मेपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.

मनपाचे दोन्ही फार्मासिस्ट कोठडीत; कोर्टात म्हणाले ‘जसे बाॅक्स मिळाले तसे पाठवले’ मनपा औषध भांडारातून ४८ रेमडेसिविर चाेरीस गेले हाेते. याप्रकरणी जिन्सी पाेलिसांनी मनपाचे मुख्य फार्मासिस्ट विष्णू दगडू रगडे (५४) आणि सहायक फार्मासिस्ट प्रणाली शेषराव कोल्हे (३३, दाेघे रा. मयूर पार्क) या दाेन कर्मचाऱ्यांना साेमवारी अटक केली हाेती. त्यांनाही मंगळवारी न्यायालयाने १० मेपर्यंत पाेलिस काेठही सुनावली. ‘इंजेक्शन गायब हाेण्यात आमचा काहीच दोष नाही. आम्हाला जसे औषधांचे पॅकिंग आले तसेच आम्ही पुढे पाठवले,’ असा बचाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ गिते व सरकारी वकिलांनी सरकारी भांडारातून एकदम ४८ इंजेक्शन गायब होणे ही गंभीर बाब असल्याचे न्यायालयाला सांगितले. हे रॅकेट कोण चालवते, यात कोणत्या मोठ्या लोकांचा सहभाग आहे का, औषध कोणाला विकणार होते, यात अजून किती लोकांचा सहभाग आहे हे तपासण्याची गरज असल्याचेही सांगण्यात अाले. दरम्यान, जिन्सी पोलिसांनी मंगळवारी भवानीनगर येथील मनपाच्या औषधी भांडाराची पाहणी करून अाैषध वाटपाची प्रक्रिया समजावून घेतली. या प्रकरणाचा तपास पाेलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखानी सहायक निरीक्षक साईनाथ गिते करीत आहेत.

मेल्ट्रॉनमधून अाणला रिकामा बॉक्स
मेल्ट्रॉन येथून सुमारे १२०० इंजेक्शनची मागणी आली. त्या वेळी ४८ इंजेक्शनचा एक बॉक्स कमी पडत असल्याचे लक्षात आले. तेव्हा या संशयितांनी मेल्ट्रॉनमध्ये जाऊन रेमडेसिविर इंजेक्शनचा रिकामा बॉक्स आणला आणि त्यात दुसऱ्या कंपनीचे इंजेक्शन भरून ते पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

‘नॉट फॉर सेल’ इंजेक्शन्स बाहेर येतात कशी?
सरकारी रुग्णालयांतील इंजेक्शनवर नॉट फॉर सेल असा शिक्का असतो. सरकारी यंत्रणेला हे इंजेक्शन ६०० ते १ हजार इतक्या कमी किमतीत मिळते. मात्र दलालांकडून औषध खरेदी केल्यानंतर हे इंजेक्शन ज्या दवाखान्यात वापरले जाते, त्या ठिकाणीदेखील ते कोठून आणले विचारत नाहीत. मनपा भांडारातील, जिल्हा रुग्णालयातून चोरीला गेलेली इंजेक्शन्सही असेच हाेते. याबाबत तपासासाठी पोलिसांकडून जिल्हा रुग्णालयाला आता तीन स्मरणपत्रे देण्यात आली. मात्र त्यांनी उत्तर दिलेले नाही.

चोरीचा गुन्हा दाखल होणे आवश्यक
आतापर्यंत शहरात रेमडेसिविर चोरीच्या चार घटना समोर आल्या. या घटनेत चोरीचे कलम न लावता अपहाराचा प्रमुख गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ४२० फसवणूक ३४, औषध किंमत नियंत्रण कायदा २०१३, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ व औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० या कलमानुसार गुन्हे दाखल झाले. मात्र कलम ३७९ नुसार चोरीचा गुन्हा दाखल होणे आवश्यक असल्याचे विधिज्ञांचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...