आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविश्वातील प्रत्येक जीव सुखी ठेव, जगात शांतता व एकात्मता नांदू दे, अजाणतेपणाने झालेल्या चुकांबद्दल क्षमा कर, प्रत्येक घरात सुख-शांती अन् समृद्धी नांदू दे, भरकटलेल्या तरुणांना चांगला मार्ग दाखव, कुरआनने दाखवलेल्या मार्गावर चालण्याची सद्बुद्धी दे, पाच वेळची नमाज अदा करणारे बनव, अशी दुआ लाखो भाविकांनी चितेगावच्या इज्तेमा समारोपप्रसंगी केली. या वेळी अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहिले. दुआनंतर तब्बल एक हजार भाविकांची जमात विविध गावात रवाना झाली. दरम्यान, संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास झालेल्या असर नमाजनंतर ३०० सामूहिक विवाह झाले.
मुस्लिम बांधवांनी व्यापार ठेवले बंद: दिल्लीतील मौलाना युसूफ बीन साद यांनी सुमारे २५ मिनिटे दुआ केली. रविवारी शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी दुकाने, व्यापार बंद ठेवले होते. सर्व भाविक मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक होते. या वेळी उलेमा म्हणाले, मुस्लिम बांधवांनी अल्लाहचा जिक्र करीत राहावे, तोच सर्वांना प्रेरणा देणारा आहे. कुरआन व हदीसने दाखवलेल्या मार्गाचे अनुकरण केल्यास चांगल्या-वाईट गोष्टींची माहिती मिळते. जीवन क्षणभंगुर आहे. त्यामुळे आदर्श जीवन जगा. पाच वेळची नमाज अदा करा, त्यामुळे कधीही वाईट विचार येणार नाहीत. परमेश्वराची भक्ती केल्यानेच मनुष्य चिंतामुक्त असतो. आर्थिक सुबत्ता येते.
मिळेल त्या ठिकाणी बसून प्रार्थना समारोपाच्या दिवशी जवळपास दोन लाख भाविक जमले होते. जवळपास ३०० एकरमध्ये इज्तेमाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांनी मिळेल त्या ठिकाणी बसून कळकळीने शांततेसाठी प्रार्थना केली. संतानांसाठी, मुलांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, आई-वडिलांच्या आरोग्यासाठी, रुग्णांसाठी लाखो हात हुंदके देत दुआ करत होते.
शिस्तीसाठी हजारो साथींचा पुढाकार दोन दिवसांत दहा हजारांपेक्षा जास्त साथींनी सेवा दिली. पार्किंग व्यवस्थेसाठी २४ तास काम केले. औरंगाबाद शहर स्वच्छतेसाठीही पुढाकार घेतला. भाविकांना कुठलीही कमतरता भासू नये यासाठी साथी तत्पर होते. समारोपानंतर पाच विशेष रस्त्यांनी रांगेने आणि शिस्तीत भाविक रवाना झाले. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.
स्टॉलधारकांना पाणी, आरोग्यसेवा या ठिकाणी ४०० पेक्षा जास्त स्टॉल होते. त्यांना २४ तास मोफत पाणी उपलब्ध करून दिले होते. हॉटेल आणि व्यावसायिकांना टँकरने मोफत पाणी देण्यात आले. पाच दवाखान्याच्या माध्यमातून मोफत आरोग्यसेवा देण्यात आली. तपासणी केल्यानंतर सर्व प्रकारची औषधी मोफत देण्यात आली. आयसीयू आणि डे केअर सेंटरसुद्धा उपलब्ध केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.