आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन खरेदी सुसाट / संतोष देशमुख:गेल्या आर्थिक वर्षात रोज नवी 226 वाहने आली रस्त्यावर; महसुलात 28 कोटींची वाढ!

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्यागिक, पर्यटन, शैक्षणिक व मेडिकल हब असलेल्या छत्रपती संभाजीनगरात १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षात रोज २२६ याप्रमाणे एकूण ८२ हजार ५१५ वाहनांची भर पडली. वाहनांच्या खरेदी-विक्रीतून शासनाला २५८.६७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्याआधीच्या वर्षी २२९.६९ कोटी रुपये महसूल मिळाला होता. म्हणजे त्या तुलनेत २८.९७ कोटींनी महसुलात वाढ झाल्याची नोंद ‘आरटीओं’नी घेतली आहे. नव्या वाहनांमध्ये दुचाकीचा ७१.३७ टक्के वाटा असून चारचाकी वाहनांचे प्रमाण १३.०६ टक्के आहे. २०२१-२२च्या तुलनेत गेल्या वर्षी वाहनांच्या विक्रीत १७ हजार ३७६ ने वाढ झाली. छत्रपती संभाजीनगरात सार्वजनिक वाहतुकीच्या तुलनेत खासगी वाहनांना अधिक पसंती दिली जाते. यामुळे वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. घरोघरी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाहने आहेत.

नव्या वाहनांत तब्बल ७१.३७ टक्के दुचाकी वर्षभरातील एकूण वाहन खरेदी-विक्रीपैकी ७१.३७ टक्के म्हणजेच ५८ हजार ८९८ दुचाकींचा समावेश आहे. १६ लाख ५० हजार वाहनांपैकी दुचाकीची संख्या १२ लाखांवर असल्याने ‘दुचाकीचे शहर’ अशी वेगळी आेळख छत्रपती संभाजीनगरला मिळाली आहे. नोकरदार, विद्यार्थी दुचाकी वाहनांना प्राधान्य देतात.

कोटींच्या वरील चार वाहने गेल्या दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत यंदा कार खरेदीत ४ हजार ५६८ ने मोठी वाढ झाली आहे. २०२०,२१ मध्ये ७,९०३ तर २०२१-२२ मध्ये ९,०६१ तर यंदा १० हजार ७८१ कार खरेदी झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये १ कोटी ३० लाख रुपये, १ कोटी २० लाख आणि १ कोटी ६ लाख रुपयांच्या दोन महागड्या कार खरेदी केल्याची नोंद आरटीओंनी घेतली आहे.

शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरला, व्यावसायिकांचे गुड्स कॅरिअरला प्राधान्य शेतीच्या मशागतीबरोबरच पूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांनी ४ हजार ४३२ (५.३७ टक्के) ट्रॅक्टर खरेदीला प्राधान्य दिले आहे. व्यावसायिकांनी ३ हजार ४६४ (४.१९ टक्के) माल वाहतुकीसाठी गुडस कॅरिअर वाहनांच्या खरेदीला पसंती दिली.