आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गत आठवड्यात 100 मिमी बरसला पाऊस, 55 मंडळांत अतिवृष्टी तर उर्वरित 366 मंडळांत हलका ते मध्यम पाऊस

औरंगाबाद (संतोष देशमुख )2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विभागातील जलसाठे 49 टक्क्यांवर स्थिर

मोठ्या खंडानंतर १६ ते २१ ऑगस्टदरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १०० मिमी पाऊस झाला. ९ टक्क्यांनी सरासरी पावसात भर पडली असून ११५ वरून १२४.५ टक्क्यांवर सरासरी पोहोचली. ५५ मंडळांत अतिवृष्टी तर उर्वरित ३६६ मंडळांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. स्थलनिहाय पर्जन्यमानात कमालीचा फरक आहे. पण सर्वदूर पाऊस झाल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले.

अतिवृष्टीमुळे आणि काढणीस आलेले मूग, उडीद पिकांच्या शेंगातील दाणे भिजून कोंब देखील फुटत असल्याने नुकसानही झाले आहे. १ जून ते ३१ जुलैपर्यंत मराठवाड्यात १४५.५ टक्के विक्रमी पाऊस पडण्याची नोंद झाली. तर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरी ९३.५ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ११.९ मिमी अत्यल्प पाऊस पडला. यामुळे सरासरी टक्केवारी ३०.२ ने घसरून ११५.३ टक्क्यांवर खाली येण्याची नोंद झाली होती. पीक कोमेजू लागल्याने चिंता वाढली होती. मात्र, १६ ऑगस्टपासून पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आणि गत आठ दिवसांत मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यांत १०५ ते १५५ मिमी जोरदार पाऊस झाला आहे.

सध्याचा पाऊस तितकासा परिणामकारक नाही
हवामान बदलामुळे सर्वदूर सारखा पाऊस होत नाही. पोषक वातावरण असलेल्या ठिकाणी अतिवृष्टी होते. तर इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो. यामुळे जलसाठ्यात वाढ झालेली नाही. पिके मात्र तग धरून आहेत. हा पाऊस तितकासा परिणामकारक नाही. - डॉ. रामचंद्र साबळे, हवामान शास्त्रज्ञ.

जलसाठ्यात वाढ नाही : पावसामुळे सध्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. परंतु गत आठ दिवसांतील पावसाने मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील जलसाठ्यात किंचितही वाढ झालेली नाही. जेथे अतिवृष्टी झाली तेथे पूर आला होता. पण बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. यामुळे सरासरी जलसाठ्यात वाढ झाली नाही. ४९ टक्क्यांवर स्थिर आहे. ५१ टक्क्यांची तूट भरून काढण्यासाठी आगामी मान्सूनचा जोरदार पाऊस पडणे नितांत गरजेचे आहे. तर तर काढणीस आलेल्या मूग, उडीद पिकांचे अतोनात नुकसान देखील होत आहे.

बातम्या आणखी आहेत...