आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसैनिक दिवसरात्र काम करून, कोणत्याही अपेक्षा न ठेवता आमदारांना तीन-तीन वेळा निवडून आणतात. तरीही हे बंडखोरी करतात. आमदार असो की नगरसेवक, त्यांना दोनदाच उमेदवारी द्या. आणि साहेबांना हात जोडून विनंती.. आता तरी गटबाजी सोडा, असा शालजोडीतून फटका जिल्हा उपप्रमुख बंडू ओक यांनी लगावला आणि सारे सभागृह दणाणून गेले.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीत औरंगाबाद जिल्ह्यातील दोन मंत्री, दोन आमदार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी सोमवारी (२७ जून) विश्वशंकर कार्यालय, विष्णुनगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संपर्क नेते विनोद घोसाळकर यांच्यासह शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, विभागीय सचिव अशोक पटवर्धन, सहसंपर्कप्रमुख माजी महापौर त्र्यंबक तुपे, नंदकुमार घोडेले, विकास जैन, अनिल पोलकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासमोर जोरदार टोलेबाजी करत ओक म्हणाले की, स्वत: निवडून यायचे, बायकोला निवडून आणायचे, पोराला पुढे आणायचे, हे किती दिवस चालणार? तुम्ही नेत्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांकडेही बघा. महापालिका निवडणुकांच्या वेळी सर्व्हे होतात.
लोक त्यांना मदत करणाऱ्या शिवसैनिक, पदाधिकाऱ्याचे नाव सांगतात. मात्र नंतर यादीत नावे बदलून जातात. आमचा हा निरोप उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत द्या. प्लीज साहेब, आता तरी गटबाजी, राजकारण बंद करा हो. ओक यांच्या वक्तव्याला शिवसैनिकांनी भरभरून टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. मोठ्या बंडखोरीनंतरही शहरात गटबाजी जोमात सुरू असल्याचे मेळाव्यात वारंवार लक्षात येत होते. दरम्यान, बंडखोर आमदारांच्या कार्यालयासमोरून २९ जून रोजी वाहन रॅली काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी बप्पा दळवी, आनंद तांदुळवाडीकर, विनायक पांडे, संतोष जेजुरकर, ऋषिकेश खैरे, हनुमान शिंदे, किरण तुपे, सुनीता आऊलवार, सुनीता देव, प्रतिभा जगताप, अनिता मंत्री, अंजली मांडवकर आदींची उपस्थिती होती. विजय वाघचौरे यांनी सूत्रसंचालन केले.
येथेही घराणेशाही, ओक यांचा नेमका रोख कुणाकडे? माजी खासदार खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश समर्थनगरातून, पुतणे सचिन बेगमपुऱ्यातून नगरसेवक झाले. घोडेले यांच्या पत्नी नगरसेवक, महापौर झाल्या. शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत वेदांतनगरातून नगरसेवकपदी निवडून आला. विकास जैन यांच्या पत्नी बन्सीलालनगरच्या नगरसेविका होत्या.
शहरात आल्यावर उद्रेकाला सामोरे जावेच लागेल घोसाळकर म्हणाले, बंडखोरीमागे फार मोठे आर्थिक कारण, भाजपची ताकद आहे. औरंगाबाद मध्य, पश्चिममध्ये गद्दारी झाली. त्यांच्यावर या शहराचे उपकार आहेत. त्यांना शहरात यावेच लागणार आहे. एंट्रीच्या दिवशी शिवसैनिकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल.
जैस्वालांना २५ कोटींचे टोकन शिरसाटांना ३८२ कोटींत कमिशन खैरे म्हणाले, बंडखोरांनी पैसे घेऊन गद्दारी केल्याने आमचा जीव तळमळतोय. या बंडखोरीसाठी प्रदीप जैस्वाल यांना २५ कोटींचे टोकन मिळाले आहे. त्यांना मी लक्ष्मण समजत होतो. मात्र आता ते लक्ष्मण राहिलेले नाहीत. बीड बायपास रस्त्यासाठी ३८२ कोटींच्या निधीतून शिरसाट यांनी कमिशन घेऊन काम सुरू केले. किती कमिशन घेतले हे सांगण्यासाठी खैरे यांनी सात बोटे दाखवली.
विकास निधी तुमची प्रॉपर्टी विकून, रिक्षा चालवून मिळाला आहे का? शिरसाट यांना उद्देशून आमदार अंबादास दानवे म्हणाले, आधी सांगा तुमचे इमान कितीमध्ये विकले गेले? तुम्ही सोशल मीडियावरील तुमचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो डिलिट करू शकता, पण शहरात शिवसैनिकांना सामोरे नाही जाऊ शकत. जो हजारो कोटी निधी तुमच्या मतदारसंघात मागील अडीच वर्षांत दिला तो तुमची प्रॉपर्टी विकून किंवा रिक्षा चालवून आलेल्या पैशातून आलाय का?
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.