आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:पालकमंत्री ताई, एकलाख चाचण्या राहू द्या, आधी रुग्णालयात इंजेक्शनच्या पुरवठ्या कडे पहा; रुग्णांच्या नातेवाईकांचा टाहो

हिंगोली21 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

पालकमंत्री ताई हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या एक लाख चाचण्यांचे राहू द्या, आधी रुग्णालयातील इंजेक्शनच्या पुरवठ्याकडे लक्ष द्या असा आर्त टाहो रुग्णांच्या नातेवाईकांनी फोडला आहे. रुग्णालयात इंजेक्शन नसल्यामुळे कोरोना रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत.

हिंगोली सारख्या छोट्या जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे सध्याच्या स्थितीत एकूण रुग्णांची संख्या १५०० वर पोहोचली आहे. याशिवाय १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १२५० रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अद्यापही १८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हिंगोली येथील दौऱ्यावर आल्यानंतर पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी धारावी पॅटर्नचा उल्लेख करून हिंगोलीतही एक लाख रॅपीड चाचण्या करण्याची घोषणा केली. मात्र रॅपिड अँन्टीजन किटचा नियमित पुरवठा नसतांना या चाचण्या कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर रिक्त पदांचा प्रश्नही भेडसावू लागला आहे. त्यामुळे हिंगोलीला धारावी पॅटर्न राबविण्याची योजना सपशेल फेल ठरली आहे.

त्यातच कहर म्हणजे आता कोरोना रुग्णांना दिले जाणारे रॅमडेसवीर हे इंजेक्शन देखील संपले आहे. रुग्णांना आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर पहिल्या दिवशी दोन इंजेक्शन दिली जातात. त्यानंतर पुढील चार दिवस प्रत्येकी एक इंजेक्शन दिले जाते. मात्र रुग्णालयामध्ये इंजेक्शन नसल्यामुळे कोरोना रुग्णांना धोका निर्माण झाला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन खरेदी करण्याचे सांगितले जात आहे. मात्र खुल्या बाजारातही सदरील इंजेक्शन नसल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर रक्त पातळ करण्यासाठी दिले जाणारे हिपॅरीन इंनेक्शन देखील बोटावर मोजण्या ऐवढेच असल्याचे सुत्रांनी सांगितले.

हिंगोलीच्या रूग्णालयात रविवारी ता. ३० दाखल झालेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाला बाहेरून इंजेक्शन आणण्यास सांगण्यात आले होते. मात्र खुल्या बाजारातही इंजेक्शन मिळाले नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ झाली.

दरम्यान रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकमंत्री प्रा. वर्षाताई एक लाख रॅपीड अँन्टीजन चाचणीचे राहूद्या आधी रूग्णालयात इंजेक्शनचा पुरवठा करण्याबाबत सूचना द्या असा आर्त टाहो फोडला जाऊ लागला आहे.

दरम्यान शासकीय रुग्णालयाकडून इंजेक्शन खरेदीचे देयक उशिराने दिले जात असल्यामुळे खाजगी पुरवठादार इंजेक्शनचा पुरवठा करण्यास टाळाटाळ करत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. निधी असतानाही देयक उशिराने का दिले जाते याबाबत तर्क-वितर्क ही लावले जाऊ लागले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी लक्ष घालून पुरेशा प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा करण्याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी केली जाऊ लागली आहे.

यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या इंजेक्शनची मागणी नोंदवण्यात आली आहे. मात्र पुरवठा झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. या इंजेक्शन बाबत थेट सिप्ला कंपनी कडे मागणी नोंदवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील दोन दिवसात इंजेक्शन पुरवठा होईल असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य मंत्र्यांकडे पत्र पाठविणार : मनिष आखरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष

जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठविणार आहे. जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन त्यापेक्षा अधिक औषधी उपलब्ध करण्याची विनंती करणार आहे.

0