आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक:नागपूर, अमरावतीत भाजपला धक्का देत मविआचा 5 पैकी 3 जागी विजय, तीन विद्यमान आमदारांना मतदारांनी नाकारले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या तीन शिक्षक व दोन पदवीधर मतदारसंघांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यात महाराष्ट्र विकास आघाडीला तीन तर भाजप व अपक्ष उमेदवारास प्रत्येकी एका जागी विजय मिळाला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर शिक्षक, अमरावती पदवीधरमध्ये त्यांचे विद्यमान आमदार ना. गो. गाणार व डॉ. रणजित पाटलांचा मविआने धक्कादायक पराभव केला. नागपुरात सुधाकर अडबाले तर अमरावतीत धीरज लिंगाडे विजयी झाले. मराठवाडा शिक्षकमध्ये मविआच्या विक्रम काळेंनी सलग चौथ्या विजयाचा विक्रम केला. पण त्यासाठी दुसऱ्या पसंतीपर्यंत थांबावे लागले. शिक्षक संघटनेचे सूर्यकांत विश्वासराव पहिल्या पसंतीत दुसऱ्या तर भाजपचे किरण पाटील तिसऱ्या स्थानी होते. नाशिक पदवीधरमध्ये मविआच्या शुभांगी पाटलांपेक्षा २९ हजारांचे मोठे मताधिक्य घेऊन अपक्ष सत्यजित तांबे विजयी झाले.

जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांनी शिकवला भाजपला धडा
दिव्य मराठी विश्लेषण

विधान परिषदेच्या ५ पैकी ३ जागांवर पूर्वी आघाडीचे तर २ ठिकाणी भाजपचे आमदार होते. आता आघाडीने तिन्ही जागा राखल्या, पण काँग्रेसच्या हट्टापायी नाशिकची हक्काची जागा त्यांना गमवावी लागली. भाजपवर नागपूर, अमरावती या बालेकिल्ल्यात पराभवाची नामुष्की ओढवली. मात्र कोकणची जागा पटकावत त्यांनी थोडीशी लाज राखली. नाशिकचे अपक्ष आमदार सत्यजित तांबेंना गळाला लावून भाजप अजून एक आमदार वाढवेल.

मुळात कोकणच्या यशाचे श्रेय भाजपला नव्हे तर शिंदेसेनेला आहे. विजयी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे मूळचे शिवसेनेचे. शिंदेंनी हा आयता उमेदवार आता भाजपला दिला. ठाणे, पालघरमधील एकनाथ शिंदेंच्या प्रभावामुळे म्हात्रे सहज विजयी झाले. जुनी पेन्शन लागू करण्यास नकार दिल्याने शिक्षकांमध्ये राज्य सरकारविरोधात रोष आहे. त्याचा फटका नागपूर व मराठवाड्यात भाजपला बसला. ‘नो पेन्शन नो व्होट’ अशा चिठ्ठ्यात चक्क मतपेटीत निघाल्या.

शिंदेंच्या बळावर भाजपला कोकणची एकच जागा, नाशकात तांबे विजयी
शिक्षक : मराठवाडा
विक्रम काळे, मविआ
दुसऱ्या पसंतीत विजयी
२३,५७७ मते
किरण पाटील (भाजप) ६,९३४ मतांनी पराभूत

शिक्षक : नागपूर
सुधाकर अडबाले
विजयी (मविआ)
१६,७०० मते
ना.गो. गाणार (भाजप) ८,४८९ मतांनी पराभूत

शिक्षक : कोकण
ज्ञानेश्वर म्हात्रे
विजयी (भाजप)
२०,६८३ मते
बाळाराम पाटील (मविआ) ९,६८६ मतांनी पराभूत

पदवीधर : नाशिक
सत्यजित तांबे
विजयी (अपक्ष)
६८,९९९ मते
शुभांगी पाटील (मविआ) २९,४६५ मतांनी पराभूत

पदवीधर : अमरावती
धीरज लिंगाडे
आघाडीवर (मविआ)
११६५ मताधिक्य
पिछाडीवर (भाजप)
डॉ. रणजित पाटील

बातम्या आणखी आहेत...