आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अर्धापूर तालुक्यातील पांगरा रोडगी शिवारातील शेतातील एका पडक्या विहीरीत बुधवारी (ता.13) रात्री बिबट्या पडला होता. दरम्यान, गुरुवारी (ता.14) बिबट्याला काढण्यासाठी वनविभागाचे तब्बल चार तास रेस्क्यु ऑपरेशन चालले. बिबट्याला पिंजर्यात कैद करण्यात आल्यानंतर ग्रामस्थांसह प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.
रोडगी शिवारात अनिल कदम यांचे शेत आहे. या शेतात एक पडीत विहीर असून या विहीराचा फारसा उपयोग करण्यात येत नाही. या पडक्या विहीरीत बुधवारी (ता. 13) रात्री बिबट्या पडला होता. दरम्यान, शेतातील नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी सालदार, कदम कुटूंबीय आले. ही विहीर उपयोगात नसल्यामुळे कोणी तिकडे लक्ष दिले नाही. पण, गुरूवारी (ता. 14) सकाळी दहाच्या सुमारास बिबट्याने डरकाळी फोडून आपल्या अस्तित्वाची जाणिव करून दिली. डरकाळीचा आवाज विहीरीकडून आल्याने शेतातील नागरिक विहीरीकडे धावले. त्यांना बिबट्या विहीरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गावात ही वार्ता वार्या सारखी पसरली.सदरील घटने बाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर वनविभाग, पोलीस ठाणे यांचे अधिकारी पथक घेऊन दुपारी हजर झाले. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले.
या घटनेचे माहिती मिळताच नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांनी भेट दिली. तसेच या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये साह्यक वनपरिक्षेत्र अधिकारी एस. डी. पवार, मानदत वन्यजीव संरक्षक अतिंद्र कट्टी, प्रसाद शिंदे, शरयू रूद्रावार,पांडुरंग धोंडगे, श्रीधर कवळे, एस. बी. सानमेटी, ज्ञानेश्वर हकदळे यांनी सहभाग नोंदवून बिबट्याला सुखरूप बाहेर काढले आहे.
बिबट्याला काढण्यासाठी ‘जेसीबी’चा वापर
बिबट्याला बाहेर काढण्यासाठी ‘जेसीबी’ चा वापर करण्यात आला. सुरवातील पाण्यात बाज सोडून त्याला स्टेबल करण्यात आले. त्यानंतर जेसीबीला बांधून पिंजरा विहीरीत सोडण्यात आला. या पिंजर्यात दोन कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. भक्ष्याच्या आमिशाने बिबट्या पिंजर्यात आला. त्यानंतर पिंजर्याचे दार बंद करण्यात आले. पिंजरा विहीरीच्या बाहेर काढकण्यात आला. बिबट्याला वाहनातून अर्धापूर येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले.
बघ्यांच्या गर्दीने शेतकर्याचे नुकसान
दरम्यान, ही वार्ता गावात पसरलेल्या नंतर बघ्यांनी विहीरीच्या परिसरात एकच गर्दी केली. त्यामुळे शेतातील हाळद, हरभरा पिकाचे खुप मोठे नुकसान झाले आहे. वनविभाग बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे ढिसाळ नियोजन दिसून आले. तर, बघ्यांच्या गर्दीमुळे शेतकर्यांचे खूप मोठे नुकसान झाल्याने वनविभागाने भरपाई देण्यात यावी, आशी मागणी शेतमालकाने केली आहे.
अडिच ते तीन वर्षाची मादी
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरा रोडगी येथील पडक्या विहिरीत पडलेला बिबट्या अडिच ते तीन वर्षाची मादी आहे. गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील जंगलातून तो आला असून याविहिरीला कठडे नसल्याने तो पडला आहे. विहिरीतील पाईच्या आडोशाला घाबरुन बसला होता. सदरील विहीर जमिनीच्या लेवलला असून 30 ते 40 फुटावर आहे. यात पंधरा ते वीस फुट पाणी आहे. सध्या त्याला वनविभागाच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले, असे मानदत वन्यजीव संरक्षक अतिंद्र कट्टी यांनी सांगतले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.