आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कळमनुरी तालुक्यात बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण; वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाऊ नये- विश्‍वनाथ टाक, वनपरिक्षेत्र अधिकारी हिंगोली

कळमनुरी तालुक्यातील कांडली शिवारात मंगळवारी (ता. 29) सकाळी एका शेतात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. त्यासाठी आढळून आलेल्या पायांच्या ठश्‍यावरून तो बिबट्याच आहे का, याची खात्री केली जात आहे.

कळमनुरी तालुक्यातील कांडली येथील शेतकरी देविदास नरवाडे व त्यांच्या पत्नी आज सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. शेतात गवत कापत असतांना त्यांना अचानक बिबट्या समोर दिसला. त्यामुळे दोघेही घाबरून पळून गेले. त्यानंतर त्यांनी या प्रकाराची माहिती माजी पंचायत समिती सदस्य राहूल उर्फ पिंटू पतंगे यांना सांगितली. बिबट्या आल्याची माहिती गावात पसरताच शेतकऱ्यांमधून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, राहुल पतंगे यांनी तातडीने वन विभागालाही याची माहिती देण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी विश्‍वनाथ टाक, वनपाल प्रिया साळवे, नरसिंग तोलसरवार, कर्मचारी केंद्रे, फड, कचरे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून माहिती घेतली. घटना स्थळाजवळ व काही अंतरावर प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले. या ठश्‍यांचे छायाचित्र घेण्यात आले असून त्यावरून तो प्राणी बिबट्याच आहे काय याची खात्री केली जात आहे. या सोबतच कांडली व बऊर शिवारात असलेल्या तलावाच्या जवळही प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्या ठिकाणीही वन विभागाचे पथक दाखल झाले आहे. तुर्तास तो प्राणी बिबट्या आहे किंवा नाही याची खात्री केली जात असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाऊ नये- विश्‍वनाथ टाक, वनपरिक्षेत्र अधिकारी हिंगोली

कांडली शिवारात आढळून आलेल्या पायाच्या ठश्‍यावरून तो प्राणी कोणता आहे याची माहिती घेतली जात आहे. सदर प्राणी बिबट्या नसावा. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांनी शेतात एकट्याने जाऊ नये तसेच लहान मुलांना जास्तवेळ बाहेर खेळू देऊ नये. शेतात निंदणी व खुरपणीची जमीनीवर बसून कामे करतांना त्या ठिकाणी एक व्यक्ती उभा ठेवावा.

बातम्या आणखी आहेत...