आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हिंगोली तालुक्यात बिबट्या आढळला, वन विभागाच्या पथकाकडून पाहणी

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील जामठी खुर्द शिवारामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आला असून गुरुवारी (ता. 14) वन विभागाच्या पथकाने शिवारात तेथे आढळून आलेल्या पायाच्या ठशावरून हा अंदाज बांधला आहे. आता या भागातील शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस एकट्याने शेतात जाणे टाळावे असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाची तयारी सुरु असून शेतात दिवसा व रात्रीच्या वेळी मशागतीची कामे सुरु आहेत. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरच्या मदतीने जमीन नांगरली जात आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर दिवसरात्र शेतात थांबून असल्याचे चित्र आहे.

हिंगोली तालुक्यातील जामठी खुर्द शिवारात बुधवारी ता. १३ रात्रीच्या वेळी राहूुल मोतीराम भवर व संतोष काशीराम भवर हे शेतात ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणीचे काम करीत असतांना अचानक त्यांना बिबट्या दिसला. त्यामुळे दोघेही घाबरून गेले. त्यांनी हा प्रकार तातडीने गावात येऊन गावकऱ्यांना सांगितला. गावकऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. काही गावकऱ्यांनी तेथे आढळून आलेले पायाच्या ठश्‍याचे छायाचित्र घेऊन वन विभागाला या प्रकाराची माहिती दिली. विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी वन परिक्षेत्र अधिकारी केंद्रे, वपनपाल मिसाळ, राठोड, केंदळे यांना तातडीने जामखी खुर्द येथे पाठविले. या पथकाने घटनास्थळावरील पायाच्या ठशाच्या पाहणी केली असता सदर ठसे बिबट्याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये ः केशव वाबळे, विभागीय वन अधिकारी हिंगोली

जिल्ह्यात बिबट्याचा वावर आहे. मात्र जामठी खुर्द शिवारात प्रथमच बिबट्या दिसून आला आहे. सदर बिबट्या कमी वयाचा असल्याचे पायाच्या ठश्‍यावरून स्पष्ट होत आहे. बिबट्या हा एकाच ठिकाणी थांबणारा प्राणी नाही, तो सतत जागा बदलतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. मात्र सतर्कता बाळगणे आवश्‍यक आहे. बिबट्या आढळून आल्यास तातडीने वन विभागाला कळवावे.

बातम्या आणखी आहेत...