आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी शस्त्रक्रिया:​​​​​​​हिंगोलीत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेला दिले जिवदान; बिजांडामधून काढली तीन किलो वजनाची गाठ, एक तास चालली शस्त्रक्रिया

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • गाठ फुटल्यास रुग्णाला धोका होऊ शकतो - डॉ. उमा सोनी, स्त्रीरोग तज्ञ हिंगोली

हिंगोलीत महिलेच्या बिजांडामध्ये झालेली तीन किलोची गाठ काठण्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. उमा सोनी व त्यांच्या पथकाला यश आले असून अतिशय गुंतागुंतीच्या असलेली शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेला जिवदान दिले आहे. शहरातील मंगळवारा भागातील मुन्नीबाई चव्हाण यांच्यावर शनिवारी ता. 3 रात्री ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. हिंगोली सारख्या शहरातही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होऊ लागल्या आहेत. हिंगोली शहरातील मंगळवारा भागातील मुन्नीबाई चव्हाण यांना मागील एक ते दिड वर्षापासून पोट दुखीचा त्रास सुरु झाला होता. मात्र प्रत्येक वेळी औषधोपचार केल्यानंतर काही प्रमाणात त्यांना आराम मिळू लागला होता.

मात्र याचवेळी त्यांच्या बिजांडामध्ये मोठी गाठ तयार होऊ लागली होती. हळूहळू ही गाठ वाढल्याने त्यांना पोटाचा आकार वाढल्याचे जाणवू लागले होते. मागील दोन दिवसांपासून त्यांना पुन्हा पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना हिंगोलीच्या कंदी नर्सींग होम येथे दाखल करण्यात आले. त्यांच्या तपासणीमध्ये बिजांडामध्ये मोठी गाठ झाली असून ही गाठ कुठल्याही क्षणी फुटून त्यांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो हे लक्षात आले. त्यामुळे डॉ. श्रीराम कंदी यांनी स्त्रीरोग तज्ञ डॉ. उमा सोनी यांना माहिती देऊन रुग्णाची तपासणी करण्याची विनंती केली. त्यावरून डॉ. सोनी यांनी मुन्नीबाई यांची तपासणी केल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक असल्याचे सांगितले.

त्यानंतर या प्रकाराची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यांनीही शस्त्रक्रियेसाठी होकार दिल्यानंतर शनिवारी ता. 3 रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल एक तास चाललेल्या शस्त्रक्रियेत डॉ. उमा सोनी, भुलतज्ञ डॉ. नितीन पुरोहित व आरोग्य पथकाने मुन्नीबाई यांच्या बिजांडातील गाठ काढून त्यांना जिवदान दिले आहे. अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल चव्हाण कुटुंबियांनी डॉ. सोनी यांचे आभारही व्यक्त केले.

गाठ फुटल्यास रुग्णाला धोका होऊ शकतो - डॉ. उमा सोनी, स्त्रीरोग तज्ञ हिंगोली
अनेक वेळा महिलांच्या बिजांडांमध्ये झालेल्या गाठीचे वेळेत निदान व शस्त्रक्रिया न झाल्यास गाठ फुटून रुग्णाच्या जिवाला धोकाही होऊ शकतो. तर शस्त्रक्रिया करतांनाही खूप काळजी घ्यावी लागते. या रुग्णावर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची तब्येतही चांगली आहे. एका रुग्णाला जिवदान देऊ शकले याचे समाधान वाटते.

बातम्या आणखी आहेत...