आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जन्मठेप:पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हल्ला करणाऱ्या पतीला जन्मठेप;  जिल्हा व सत्र  न्यायालयाचा निकाल

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कलम ३०७ अन्वये आरोपीला जन्मठेप

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायधीश एम. एस. देशपांडे यांनी सुनावली. सुभाष गोरख दळवे (३०, रा. चौंढाळा, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे. पत्नी विद्या सुभाष दळवे (२८) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार माहिती अशी की, आरोपी सुभाषचा विवाह विद्याबरोबर १२ जून २००९ रोजी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. पती सुभाष नेहमी विद्याच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता. त्याचप्रमाणे घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत म्हणून छळ करत होता. एकदा विद्याने माहेरहून ५० हजार रुपये आणून दिले होते. त्यानंतरही त्रास कमी झाला नाही म्हणून विद्या ही त्याच गावातील माहेरी निघून गेली होती.

दोघांमध्ये अनेकांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही. ५ जानेवारी २०१८ रोजी विद्या ही गावातील करताडे यांच्या शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी गेलेली होती. त्या वेळी दुपारी दीड वाजता आरोपी सुभाष शेतात गेला. त्याने विद्याला नांदण्यास चल असे म्हणून अाग्रह धरला. मात्र तू नेहमी चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करतोस असे म्हणून विद्याने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सुभाषने कुऱ्हाडीने डोक्यात दोन वार केले. डोक्याच्या पाठीमागे एक आणि कानावर एक व हातावर दोन असे सहा वार केले. फिर्यादी विद्या ओरडल्याने शेतातील महिला धावून आल्या. मात्र तोपर्यंत आरोपी सुभाष पळून गेला. विद्यावर विहामांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून घाटीत दाखल केले. फिर्याद देणाऱ्या विद्या आणि प्रत्यक्षदर्शीं यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

कलम ३०७ अन्वये आरोपीला जन्मठेप
आरोपी सुभाषने खुनाच्याच उद्देशाने नियोजनबद्ध रीतीने हल्ला केला. जखमांचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. यात फिर्यादी विद्याचा मृत्यू होणार हे आरोपीला माहीत होते. या हल्ल्यात तिच्या डोक्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे, त्याचप्रमाणे हातामध्ये रॉड टाकलेला आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सुनावणीनंतर न्यायालयाने कलम ३०७ अन्वये आरोपी सुभाषला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम फिर्यादीला द्यावी त्याचप्रमाणे नुकसान भरपाई देता येईल का, यासाठी हे प्रकरण विधी सेवा प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...