आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्याचे धडे:नव्या वर्षात जि.प.च्या 2 लाख मुलांना देणार जीवन कौशल्याचे धडे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना जीवन कौशल्याचे धडे देण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २१३० शाळांमधील २ लाख १७ हजार ४२० विद्यार्थी लाभ घेणार आहेत. यात करिअर, व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्याविषयीची शैली कशी असावी. याबाबत खास तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने एज्युकेशन सेल तयार करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिली आहे.

कोरोनाकाळात झालेले शैक्षणिक नुकसान अजूनही भरुन निघालेले नाही. विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये झालेले बदल आणि अध्ययनस्तराची घसरण लक्षात घेवून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून या उपक्रमाची नवीन वर्षात सुरुवात केली जाणार आहे.

याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आहे. कोरोनाकाळात शाळा, खेळांपासून दूर झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला तणाव, चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा, एकाग्रता नसणे आदीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे असे उपक्रम हाती घेत असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले. याबरोबरच शालेय दशेतच विद्यार्थी शिस्त लागावी, त्यांच्यात निर्णय क्षमता यावी, यासाठी आठवड्याचे वेळापत्रक तयार केले आहे. यासाठी दहावीच्या वर्गातील १० तज्ज्ञ शिक्षक नेमण्यात येणार आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन केंद्रांनुसार शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

शिक्षकांनाही प्रशिक्षण देणार
आतापर्यंत प्रत्येक उपक्रम दिनविशेषच्या निमित्ताने घेतले जात हाेते. मात्र, आता विद्यार्थ्यांची काळानुरूप गरज ओळखून नव्या वर्षात जि. प. शिक्षण विभाग हा उपक्रम राबवणार आहे. यात सातत्य असावे यासाठी शिक्षकांनादेखील प्रशिक्षण देण्यात येइल. -डॉ. सतीश सातव, शिक्षण उपनिरीक्षक, शिक्षण उपसंचालक कार्यालय

आठवडानिहाय वेळापत्रक
सोमवार : परिपाठ, करिअर समुपदेशन
मंगळवार : मॉरल व्हॅल्यू
बुधवार : एक केस स्टडी घेऊन त्यावर विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली जातील.
गुरुवार : आर्थिक नियोजन कसे असावे
शुक्रवार : श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर जनजागृती करण्यात येईल.
शनिवार : दप्तरमुक्त आरोग्य संवर्धन शाळा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल.

बातम्या आणखी आहेत...