आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हहिंदू जनजागृती समितीचा आग्रह:अकरा राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतर बंदी कायद्याची पायाभरणी

महेश जोशी | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनातच प्रस्ताव मांडण्याची मागणी

लव्ह जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतराच्या वाढत्या घटनांमुळे ११ राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याच्या दिशेने सध्या पायाभरणी सुरू आहे. हिंदुत्ववादी संघटनांचा पाठपुरावा सुरू असताना आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुली व त्यांच्या कुटुंबांत संवाद ठेवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली समिती त्या दिशेने राज्याचे पहिले पाऊल मानले जाते. आजघडीला ११ राज्यांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क संरक्षण कायदा किंवा धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात आहे. महाराष्ट्रातही असा कायदा करण्याची हिंदू जनजागृती समितीची आग्रही मागणी असून समिती पाठपुरावा करत आहे. याबाबत विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका लक्षवेधीवर उत्तर देताना तसे संकेत दिले.

समितीची शिफारस
धर्मांतर बंदी कायद्याबाबत अभ्यास करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. समितीने अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, अशी शिफारस २९ नोव्हेंबर २०१४ ला एका अहवालाद्वारे शासनास केली होती. हा अहवाल विधिमंडळात मांडावा व त्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

राज्यात वाढत्या घटना : वसईच्या श्रद्धा वालकरची दिल्लीत झालेली हत्या ते नागपूरचे खुशी हत्या प्रकरण
{ नितेश राणेंची होती पावसाळी अधिवेशनातच मागणी

* हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगडचे संघटक सुनील घनवट, प्रसिद्धिप्रमुख अरविंद पानसरेंनी धर्मांतरासंबंधी घटनांची यादी मुख्यमंत्र्यांना दिली. * लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे करत हत्या केली. * औरंगाबादच्या दीपक सोनवणेचे एका तरुणीवर प्रेम जडले. त्याला धर्मांतरासाठी मारहाण झाली. गुन्हे, धमक्या, अपहरण अशा त्रासासह त्याला ११ लाखांचा गंडा बसला. * १० नोव्हेंबर २०२२ : मालेगाव कॅम्प परिसरातून एका आदिवासी मुलीचे अपहरण झाले. * २ नोव्हेंबर २०२२ : कोल्हापुरातून अल्ताफ काझी या युवकाने अल्पवयीन मुलीला पळवून नेले. * ३ सप्टेंबर २०२२ : अमरावतीच्या धारणीत उच्चशिक्षित तरुणीचा चंद्रव्हिला चॅरिटेबल ट्रस्टने आंतरधर्मीय विवाह लावला. बनावट मॅरेज सर्टिफिकेट दिले. * २७ सप्टेंबर २०२२ : चेंबूरमध्ये बुरखा घालण्यास नकार देणाऱ्या रूपालीची पती इक्बालकडून हत्या. १ मे २०२२ रोजी गोरेगावात मोहंमद अन्सारी याने १८ वर्षीय सोनम शुक्ला हिची हत्या केली. * २०१९ मध्ये नागपूर येथे खुशी परिहारची अश्रफ शेखने हत्या केली.

गुन्ह्यात महाराष्ट्र पुढे : एनसीआरबीनुसार महिलांशी संबधित गुन्ह्यांमध्ये २०२१ मध्ये २०२० च्या तुलनेत १५.३ टक्क्यांची वाढ झाली. उत्तर प्रदेश व राजस्थाननंतर ३९,५२६ गुन्ह्यांसह महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. १ लाख लोकसंख्येमागे देशात २०२० मध्ये असे ५६.५% गुन्हे होते. २०२१ मध्ये ते ६४.५ % झाले. यांचा लव्ह जिहाद व धर्मांतराच्या दृष्टीने तपास करण्याची आवश्यकता घनवट यांनी वर्तवली.

कायद्याची शक्यता यामुळे : आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण मिळावे म्हणून महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली "आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती' स्थापन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याबाबत अन्य राज्यातील कायद्याचा अभ्यास सुरू असल्याचे सांगितले आहे.

अधिवेशनात अध्यादेश काढा
दहा राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही कठोर ‘धर्मांतर बंदी कायदा’ करावा. येत्या हिवाळी अधिवेशनात अध्यादेश काढून कायदा संमत करावा.
- सुनील घनवट, संघटक, हिंदू जनजागृती समिती

अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात धर्मांतर बंदी कायदा आणला पाहिजे. यामुळे निष्पाप महिलांना फसवून, त्यांचे धर्मांतर करून होणारा छळ रोखला जाईल. -नितेश राणे, भाजप आमदार

या कायद्यावर अजून चर्चा झालेली नाही. यामुळे हिवाळी अधिवेशनात कायदा येईल किंवा नाही, हे सांगता येणार नाही. -अतुल सावे, कॅबिनेट मंत्री

बातम्या आणखी आहेत...