आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलन:दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना साहित्यिकांचा पाठिंबा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना शांततेने भेटण्याऐवजी आणि त्यांची बाजू ऐकण्यापेक्षाही त्यांच्यावर ज्या प्रमाणे पाण्याचे फवारे एवढ्या थंडीत सोडले जात आहे, आसू गॅसचा वापर केला जात आहे. हा प्रकार अयोग्य असून, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा असल्याचे राज्यातील प्रसिद्ध साहित्यिकांनी निवेदनाद्वारे जाहिर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान इत्यादी राज्यातील शेतकरी, आंदोलनाच्या निमित्ताने दिल्ली येथे एकवटले आहेत. सुरुवातीला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. कडाक्याच्या थंडीतही पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठी हल्ला करत सरकारने अमानुषपणे शेतकऱ्यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तरीही निर्धाराच्या जोरावर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मुळातच देशभरातल्या शेतकऱ्यांच्या मतांचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता, न जुमानता मोदी सरकारने ही विधेयके मंजूर केली. या कायद्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर श्रम करीत गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. कोरडवाहू आणि आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या हमी भावाचे जे कवच आहे ते गळून पडेल अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्याकडे साफ दुर्लक्ष करून सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अमानुषच नव्हे तर निषेधार्ह आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यापासून शेतकऱ्यांचा हा असंतोष खदखदत असताना त्यांच्याशी संवाद करण्याचे दायित्व सुद्धा हे सरकार पार पाडत नाही हे संतापजनक आहे. सरकारने तातडीने या शेतकऱ्यांशी संवाद साधावा. दिल्लीत निर्धाराने एकवटलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. शेतीच्या शोषणव्यवस्थेची मांडणी करणाऱ्या महात्मा जोतीराव फुले यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटलांपर्यंत अनेक धुरीणांनी याच मातीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने लढे दिले. आज दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून राजन गवस, भास्कर चंदनशिव, अतुल देऊळगावकर, नारायण कुळकर्णी कवठेकर, आसाराम लोमटे, आनंद विंगकर, प्रमोद मुनघाटे, बालाजी सुतार, सुरेखा दळवी, अरुणा सबाने या साहित्यिकांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser