आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक नेत्यांना विश्‍वासात घेऊनच लढवणार - जयंत पाटील

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या कामाचे कौतूक

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडीने एकत्रीत लढविण्याचे प्रयत्न आहेत, मात्र स्थानिक नेत्यांना विश्‍वासात घेऊनच त्या संदर्भातील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी ता. 29 पत्रकार परिषदेत दिली आहे. ही पत्रकार परिषद शासकिय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली असून यासाठी जयंत पाटील यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांची उपस्थिती होती.

यावेळी पाटील म्हणाले की, हिंगोली लोकसभेची जागा परत राष्ट्रवादीकडे घेण्याबाबत तुर्तास कुठलाही विचार नाही. निवडणुकीच्या वेळीच याबाबत निर्णय घेतला जाईल. तर स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडीने एकत्रीत लढविण्याचे आमचे प्रयत्न आहेत. राष्ट्रवादीदेखील एकत्रीत निवडणुक लढविण्यावर चर्चा करेल. मात्र त्यासाठी स्थानिक नेत्यांना विश्‍वासात घेऊनच या संदर्भातील निर्णय घेतला जाईल.मराठवाड्यातील प्रकल्पांमधून पाणी वहन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे प्रकल्प व कालव्यांमधून गाळ काढणे व इतर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

मराठवाड्यातील हक्काचे असलेले १०२ टीएमसी पाण्यापैकी बरेच पाणी वाहून जाते. त्यामुळे हे पाणी मराठवाड्यात वापरले जावे यासाठी नवीन प्रकल्प हाती घेण्याची आवश्‍यकता असून त्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कयाधू नदीचे वाहून जाणारे पाणी साठवून त्याचा जास्तीत जास्त सिंचनासाठी कसा वापर करता येईल या संदर्भात इस्त्राईल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. त्याबाबत अभ्यास करण्यासाठी इस्त्राईल सरकारशी बोलणे सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हिंगोली जिल्हयाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

पूर्णा नदीवरील पोटा, जोडपरळी, पिंपळगावकुटे या उच्चपातळी बंधाऱ्यांतून २८ दशलक्ष घनमिटर पाणी अडविले जाणार आहे. त्यासाठी ४९४ कोटी रुपयांचा खर्च होणार असून त्यातून ४१०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. मात्र सदर प्रकल्प निकषात बसत नसल्यामुळे त्यांना मान्यता देण्यात आली नाही. मात्र आता विशेष बाब म्हणून या प्रकल्पांना मंजूरी देण्याबाबत जलसंपदा विभागाच्या बैठकित निर्णय झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

हिंगोली जिल्हयातील प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी नांदेडचा यांत्रिकी उपविभाग हिंगोतील स्थलांतरीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच या विभागाने अत्याधुनिक यंत्र खरेदीचा प्रस्तावही तयार केला आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या दुरुस्तासाठी मनुष्यबळ व यंत्र उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर हिंगोली जिल्हयाचे पाणी इतर जिल्ह्यात वळविण्याबाबत कुठल्याही प्रकराचा निर्णय झाला नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या कामाचे कौतूक
राष्ट्रवादीच्या संवाद दौऱ्यात हिंगोली जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांचे काम चांगले आहे. त्यांच्या नेतृत्वात हिंगोली जिल्हयात पक्ष संघटन अधिक बळकट होईल असा विश्‍वास व्यक्त करून त्यांनी चव्हाण यांच्या कामाचे काैतूक केले.

बातम्या आणखी आहेत...