आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औंढा नागनाथ तालुक्यातील धारखेडा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तब्बल एक तास शिवारात फिरून अखेर गांजाच्या शेतीचा प्रकार उघडकीस आणला. पोलिसांनी रविवारी (ता. १३) हळद व कापसाच्या पिकांमधे लावलेली १०८ झाडे जप्त केली असून त्यांची किंमत ८४००० रुपये आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या कारवाईमुळे आता स्थानिक पोलिसांचे लक्ष गांजाच्या शेतीकडे लागले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी ता. १२ औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा व वसमत तालुक्यातील नहाद येथे गांजाची शेती उघडकीला आणली आहे. त्यानंतर या भागात अनेक ठिकाणी गांजाची शेती केली जात असल्याची चर्चा सुरु होती. त्यावरून गुन्हे शाखेनेही माहिती घेण्यास सुरवात केली होती. यामध्ये धारखेडा शिवारात गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरून पोलिस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपाधिक्षक रामेश्वर वैजने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक जगदिश भंडारवार, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, सुवर्णा वाळके, जमादार बालाजी बोके, विलास सोनवणे, भगवान आडे, सुनील अंभोरे, विठ्ठळ कोळेकर, यांच्या पथकाने आज दुपारपासूनच शेतात तपासणी सुरु केली होती. तब्बल एक तासाच्या शोध मोहिमेनंतर शेत गट क्रमांक ३८ मध्ये वसंता पंडित कराळे याने वहिती केलेल्या शेतात हळद व कापसाच्या पिकांमध्ये १०८ गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले. या झाडांचे वजन १६ किलो असून त्यांची किंमत ८४००० रुपये आहे. पोलिसांनी छापा टाकल्याची माहिती मिळाल्यानंतर वसंता कराळे हा फरार झाला. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात वसंता कराळे याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.