आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओमायक्रॉनचे रुग्ण वाढत चालल्याने लॉकडाऊनशिवाय अन्य पर्याय नाही, असा सूर राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री लावत आहेत. त्याची अंमलबजावणी औरंगाबादमध्ये झाल्यास दररोज किमान १२५ कोटींचे नुकसान होईल, असा अंदाज विविध क्षेत्रातील मान्यवर, अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या दोन लाटांनंतर औरंगाबादची अर्थव्यवस्थाही गेल्या काही महिन्यांत भरून निघत असताना तिसऱ्या लाटेचे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसानीचा अंदाज काढण्यासाठी दिव्य मराठी प्रतिनिधीने काही अर्थतज्ज्ञ, व्यापार क्षेत्राचे अभ्यासक आणि व्यावसायिकांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी किमान १२५ कोटींचा रोज फटका बसेल, असे सांगितले.
वाळूजला ३८००, रेल्वे स्टेशन १५०, चिकलठाणा ७००, शेंद्रा ४००, पैठण ५०० तर डीएमआयसीत ७५ उद्योग आहेत. येथे २,२५,००० कामगार काम करतात. महिन्याला २ ते २.५ हजार कोटींची तर दिवसाकाठी ६५ ते ७० कोटी रुपयांची उलाढाल होते. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघात ८५ संघटना समाविष्ट आहेत. त्यांची एकूण दैनंदिन उलाढाल ५० कोटींच्या वर आहे. शहरात २७५ तर जिल्ह्यात १७५ परमिट रूम आहेत. जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंटची संख्या १२०० तर ढाबे ९०० पेक्षा अधिक आहेत. बारची दिवसाची सरासरी २० लाख रुपये उलाढाल होते.
तर हॉटेल, रेस्टॉरंट व लॉजिंगची दिवसाकाठी ७० ते ८० लाखांची उलाढाल आहे. दोन्ही मिळून दिवसाला एक कोटीच्या पुढे उलाढाल होते. औरंगाबाद जिल्हा पेट्रोल असोसिएशनचे २०० हून अधिक पंपचालक सदस्य आहेत. दिवसाला ४ ते ४.५० लाख लिटर पेट्रोलची विक्री होते. १११ रुपये लिटर दराप्रमाणे ४ कोटी ९९ लाखांची उलाढाल होते. दिवसाला २ ते २.५० लाख लिटर डिझेलची विक्री होते. ९६ रुपये लिटरप्रमाणे २ कोटी ४० लाखांची म्हणजे दिवसाला ७ ते ७.२५ कोटी रुपयांची उलाढाल होते. या साऱ्यांचे लॉकडाऊनने नुकसान होणार, असा प्राथमिक अंदाज आहे.
पुन्हा बेरोजगारी वाढण्याची भीती
आता लॉकडाऊन लावले तर सर्वच व्यवसायांवर परिणाम होईल. अनेक जण बेरोजगार होतील. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नाही. त्यापेक्षा सायंकाळची गर्दी रोखावी. - नारायण सारडा, सारडा प्रोव्हिजन, गारखेडा परिसर
नियम पाळण्याची सक्ती करा
अगोदरच ब्यूटी पार्लरचा ९० टक्के व्यवसाय बंद झाला आहे. त्यात आणखी नुकसान नको. बाजारपेठ बंद करण्यापेक्षा लोकांना नियमांचे पालन करण्यास सांगावे. -सुप्रिया सुराणा, ब्यूटी पार्लर चालक, औरंगपुरा
गरिबांना आयुष्यातून उठवू नका
ओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रातील काही शहरांत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात येत आहेत. त्यापाठोपाठ पुन्हा बाजारपेठेला कुलूप ठोकण्याचा विचार होऊ शकतो. आताच कुठे अर्थव्यवस्था सुरळीत होत असताना पुन्हा कामधंदा बंद होणार या भीतीने हातावर पोट असणारे छोटे व्यावसायिक, कामगार गारठले आहेत. गेल्या दोन वर्षांतील अनुभव लक्षात घेता लॉकडाऊन लावून गरिबांना आयुष्यातून उठवू नका, अशी आर्जवे त्यांनी केली आहेत.
कोरोनामुळे अनेक व्यवसाय बंद पडले. आता तिसऱ्या लाटेत लॉकडाऊन लावल्यास उपासमारीची वेळ येईल. अनेक जण पुन्हा बेरोजगार होतील, अशी शक्यता आहे. अशाच प्रकारच्या भावना राजदरबार वस्त्र दालनाचे किशोर काल्डा तसेच हातगाडीचालक राजेंद्र क्षीरसागर, रिक्षाचालक प्रदीप गोसावी, इलेक्ट्रिशियन महसूद पठाण यांनी व्यक्त केल्या.
व्यावसायिकांना वेठीस धरू नका
गेल्या दोन लाटांत मोठे नुकसान झाले. ओमायक्रॉन जास्त नुकसानदायक नाही. अनेकांनी लस घेतली आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावून व्यावसायिकांना उगाच वेठीस धरू नये. त्रास देऊ नये. - एकनाथ गोपाळ, संचालक, ओम व्हेज रेस्टॉरंट
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.