आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाॅकडाऊनमध्ये वाढले बालविवाह:दहावीच्या वर्गातील काही विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून शिक्षक चक्रावले

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

काेराेनामुक्त गावातील आठवी ते बारावीपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग १५ जुलैपासून सुरू झाले. प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून नवीन शैक्षणिक वर्षात प्रथमच विद्यार्थी- विद्यार्थिनी वर्गात परतल्याने शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण हाेते. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी काही शाळांना भेट दिली तेव्हा त्यांना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पण औरंगाबाद, गंगापूर तालुक्यातील चार-पाच गावांत दहावीच्या काही विद्यार्थिनी चक्क मंगळसूत्र घालून वर्गात आल्याचे दिसल्याने वर्गशिक्षक व अधिकाऱ्यांना धक्काच बसला. चाैकशी केली असता कुटुंबीयांनी लाॅकडाऊनच्या काळात लग्न लावून दिल्याचे या मुलींनी खाली मान घालून सांगितले. हे प्रातिनिधिक चित्र संपूर्ण ग्रामीण भागात बालविवाहांचे वाढते प्रमाण अधाेरेखित करणारे आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत. गतवर्षी प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर काही दिवस शाळा सुरू झाल्या हाेत्या, पण लगेचच बंदही झाल्या. नवीन शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू झाले असले तरी १४ जुलैपर्यंत ऑनलाइनच वर्ग सुरू हाेते. मात्र आता ज्या गावात गेल्या महिनाभरात एकही काेराेना रुग्ण सापडला नाही अशा गावात शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील ५९५ गावांतील ४८८ शाळांची गुरुवारी घंटा वाजली. पहिल्या दिवशी आठवी ते बारावीच्या एकूण ६४ हजार २८२ विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ५०९ विद्यार्थ्यांनीच म्हणजे फक्त २९ टक्के हजेरी लावली. २२८० शिक्षक उपस्थित हाेते. यात लसीचा पहिला डाेस घेतलेले १३३२, तर दाेन्ही डाेस घेतलेल्या १८५० शिक्षकांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन काेराेना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी हाेते की नाही याची पाहणी केली. माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले, ‘सुविधांचा अभाव असल्याने ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण तितकेसे प्रभावी ठरत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढलेला आहे. त्यांच्या शिक्षणातील अडथळे आता पूर्णपणे दूर हाेतील.

ग्रामीण भागात बालमजुरी, बालविवाहांचे प्रमाण वाढत असल्याने ते राेखण्यासाठी शाळा सुरू हाेणे गरजेचे हाेते. पहिल्या दिवशी विद्यार्थी संख्या कमी असली तरी मुलींची उपस्थिती चांगली होती. परंतु एका गावातील पाहणीत दहावीतील तीन-चार विद्यार्थ्यांचे लॉकडाऊनमध्ये लग्न झाल्याचेही दिसून आले. त्यांची घरची परिस्थिती, सामाजिक- आर्थिक स्थितीचे परिणाम यामुळे त्या मुलींचे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान हाेत असल्याचे दिसून आले.’

दरम्यान, मांडकी, पळशी, पळशी तांडा, पोखरी येथील विद्यार्थ्यांना विचारले असता दहापैकी सात मुलांनी स्मार्टफोन नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेता आले नसल्याचे सांगितले. आता राेज वर्गात येणार असल्याचेही ते म्हणाले.

आता शेतात नव्हे शाळेत
शाळा बंद असल्याने मी शेतात कामाला जात होतो. पण आता शाळा सुरू झाल्याचा खूप आनंद होतोय. ऑनलाइन वर्ग व्हायचा. पण तो काही कळत नव्हता. समजायला अडचण येत होती. शंकाही विचारता येत नाही. पण आता आई-वडीलच म्हणतात की शेतात नको येऊ.शाळा सुरू झाली. शाळेत रोज जा. - भागवत साळुंके विद्यार्थी

ऑनलाइन अडचणीच जास्त
दहावीचे वर्ष असल्याने खूप काळजी वाटत होती. कारण मी क्लासेस लावलेले नाही. प्रत्यक्ष शाळा भरत नव्हती, तेव्हा ऑनलाइन वर्गात अडचणी खूप येत हाेत्या. रेंज येत नाही. घरात आम्ही भाऊ- बहिणीच शिकणारे आहेत. काही समजलं नाही तर शंका कुणाला विचारावी. आता प्रत्यक्ष शाळेत शिक्षक आणि वर्ग मैत्रिणींसोबत शिकायला छान वाटतं. - पायल डोरले, विद्यार्थिनी

काेराेनामुक्त ५९५ गावांतील शाळा सुरू, २९ टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती
- गंगापूर तालुक्यातील एका गावातील शाळेत दहावीच्या वर्गात काही मुली मंगळसूत्र घालून आलेल्या दिसल्या.
- शेतकरी कुटुंबातील आर्थिक विवंचना, दारिद्र्य व इतर समस्यांमुळे बालविवाह उरकण्यात आल्याची माहिती समाेर आली.
- शाळा बंद, वयात आलेली मुलगी घरात बसलेली पाहून पालकांनी लग्नासाठी तगादा लावला. लाॅकडाऊन काळात कमी खर्चात लग्ने हाेत हाेती. वधूपक्षाला खर्चाची चिंता हाेती तर वरपक्ष खर्च करण्याची तयारी दर्शवत हाेता. त्यामुळे १५-१६ वर्षांच्या मुलीचे लग्न उरकण्यात आल्याचे एका गावकऱ्याने सांगितले.

दारिद्र्य, आर्थिक विवंचना मुख्य कारण
सर्व गावांत शाळा सुरू झाल्यावर आणखी बालविवाह समाेर येतील

सध्या काही गावांतच शाळा सुरू झाल्याने बालविवाहाची चार-दाेन उदाहरणे समाेर येत आहेत. सर्व शाळांचे वर्ग सुरू हाेतील तेव्हा आणखी दुप्पट उदाहरणे समाेर येऊ शकतील. जिथे एकच महिला पालक आहे आणि घरात मुलगी आहे त्यांची स्थिती आणखी विदारक आहे. ऑनलाइन शिकणारे विद्यार्थी आणि पटावर असलेले विद्यार्थी याचादेखील विचार व्हायला हवा. पटावर मागील वर्षी जे विद्यार्थी होते पण आता ते वर्गात दिसत नाही, मग ते गेले कुठे, याचा गांभीर्याने विचार व्हावा. रेणुका कड, सामाजिक कार्यकर्त्या

बातम्या आणखी आहेत...