आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबीररंग:बुरा देखन मैं चला...

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज गाचे दोष दाखवून देताना एखाद्या शास्त्रज्ञासारखी संशोधन करणारी आपली दृष्टी आपल्या आत पाहताना कुंठित होते. आपल्याला आपले दोष कधीच दिसत नाहीत, म्हणून आपण नेहमी इतरांना दोष देत राहतो. इतरांचे दोष दाखवता दाखवता आपण आपल्यातले दोष सुधारण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही, ही खरी शोकांतिका आहे. कबीर याच विषयावर किती सटीक लिहितात पाहा... बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय। जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय॥ कबीर म्हणतात, मी वाईट व्यक्ती शोधायला बाहेर पडलो तर मला कुणीच वाईट दिसलं नाही. मग आपल्याच अंतरंगात, मनात थोडं डोकावून बघितलं तर मला दिसलं की, माझ्यापेक्षा वाईट कुणीच नाही. आत्ता लगेच एक प्रयोग करा. हा लेख थोडा वेळ बाजूला ठेवा. आहात तिथे उभे राहून किंवा बसून अगदी मोजून काही सेकंद डोळे मिटा. अगदी घड्याळ लावून, शक्यतेनुसार एक ते पाच मिनिटं त्याच स्थितीत थांबा. बाहेरचं दिसणं बंद झालं की, आपसूकच तुमच्या आत काय काय चाललंय, ते दिसायला लागेल... केलात प्रयोग? काय दिसलं? अर्थात या प्रश्नाचं प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असेल. पण, यात सुरुवातीचा किमान एक मिनिटभर गोंधळ, एकामागून एक असंबद्धपणे येणारे विचार, कल्पना हे सगळ्यांच्या बाबतीत समान असेल. या पहिल्या मिनिटभरातच तुमच्या लक्षात येईल की, तुमच्या मनात रागाच्या, द्वेषाच्या, तिरस्काराच्या, असूयेच्या भावनांचा मोठा ढीग आहे. कधीतरी कुणाशी तरी झालेल्या भांडणातून तो उद्भवला असेल, कुणीतरी केलेल्या, सलत असलेल्या अपमानातून तो उद्भवलेला असेल किंवा असंच काही. कबीर हेच तर सांगताहेत. आपल्या प्रत्येकाच्या मनात असा एक ‘बुरा’ माणूस लपलेला आहे. ज्यांना त्यावर मात करता येत नाही किंवा ज्यांची या ‘बुराई’वरची पकड निसटत जाते, ते हळूहळू हिंसक, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दिशेनं प्रवास करतात. मुळात आपल्यात ‘बुराई’ आहे, ही गोष्ट आधी स्वतःची स्वतः तरी मान्य करायला पाहिजे, जशी कबीर अत्यंत प्रामाणिकपणे करतात. साँच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप। जाके हिरदे साँच है, ताके हिरदे आप।। या दोह्यात कबीर ‘बुराई’पासून वाचण्याचा अत्यंत साधा उपाय सांगतात. ‘साँच’ म्हणजे सत्यासारखं तप नाही आणि असत्यासमान पाप नाही. ज्याच्या हृदयात सत्य वसते, त्याच्या हृदयात ईश्वर वास करतो. यापलीकडेही या दोह्याचा अर्थ आहे. रात्री झोपताना दिवसभर आपण काय काय केलं, हे आपसूकच आपल्या नजरेसमोरून जातं. आपण काही वाईट केलं असेल, कुणाला फसवलं असेल, त्रास दिला असेल, तर ते डोळ्यासमोर येतं. अशा गोष्टी सातत्यानं आपल्यालाच कोसत राहतात. ज्यामुळं असं कोसणं वाट्याला येईल, अशा गोष्टी केल्या नाहीत, तर आपण आपलं जीवन संतुष्ट मनाने जगू शकतो. करै बुराई सुख चहे, कैसे पावै कोय। बोवे पेड बबूल का, आम कहाते होय।। या दोह्यातून तर कबीरांनी अगदी खेडुतापासून चॅट-जीपीटी वापरणाऱ्यापर्यंत सगळ्यांना सहजच उमगेल, असा संदेश दिलाय. दुसऱ्यांचं वाईट करून किंवा वाईट काम करून आपल्याला सुख मिळावं, अशी अपेक्षा करणं फोल आहे. म्हणजे तुम्ही बाभळीचं बी पेरलंत तर त्याला रसाळ आंबे कसे लगडतील? असा अत्यंत साधा प्रश्न ते इथे विचारताहेत. आपण जंगलं नष्ट केली, वन्यजीव मानवी वस्तीत शिरले.. आपण झाडं तोडली, त्यामुळं पर्यावरणाचा समतोल बिघडला.. आपण तंत्रज्ञानाचा अतिरेक करतोय, त्यामुळं संवाद तुटत चाललाय.. या सगळ्याचं कारण आपण त्यांच्या परिणामांची बीजं आधीच पेरली आहेत. कबीर नेहमीच संवादाची, आत्मसंवादाची भाषा बोलतात. आपण समाजमाध्यमं, फोन, गप्पा यातून बाह्यविश्वाशी (आपल्याला दुतर्फी वाटत असला तरीही) एकतर्फी का होईना, संवाद साधतो. पण, कबीर तुम्हाला या सगळ्या रहाटगाडग्यातून बाहेर ओढून पुन्हा तुमच्याच समोर उभं करतात नि आरसा दाखवतात, आत्मसंवादाचा मार्ग दाखवून त्यावर चालायला सांगतात. ‘बुरा देखन मैं चला...’ हा दोहाही आरसा दाखवतो. ‘बुराई’ किंवा ‘अच्छाई’ जे शोधायचंय, ते तुमच्या आतच शोधा. तुमच्यातल्या वाईटपणाची, अपयशाची सगळी कारणं तुमच्याच आत आहेत. ‘यू आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉटएव्हर यू आर, अँड नो वन एल्स.’ कारण तुम्ही एक स्वतंत्र, बुद्धिमान, चाणाक्ष सजीव आहात नि तुमच्या इच्छेशिवाय तुमच्यात कुणीही, कणभरही बदल करू शकत नाही. चला, कबीर सांगताहेत तशी निदान ‘बुराईच्या शोधाची यात्रा’ तरी सुरू करूयात. अर्थात तशी आपली ‘आतून’ इच्छा असेल तर...

डॉ. भालचंद्र सुपेकर bhalchandrasauthor@gmail.com संपर्क : ९८८१०९८४३५